E0A486E0A4A7E0A580 E0A495E0A4B3E0A4B8 E0A4AEE0A497 E0A4AAE0A4BEE0A4AFE0A4BE 734x1024

आधी-कळस-मग-पाया

आधी-कळस-मग-पाया

सुनिश्चित उद्दिष्टे: आर्थिक नियोजनाची पहिली पायरी

दोन आठवड्यापूर्वी आपण इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात काय पथ्यं पाळावीत ते बघितलं, त्यात ‘सुनिश्चित उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी गुंतवणूक’ करणे गरजेचे आहे असे म्हटलं होतं. तसं बघायला तर ऐकणाऱ्याला हा सल्ला अगदीच गुळमुळीत किंवा बाळबोध वाटू शकतो. कारण आपण ह्याचा खोलात जाऊन विचार का करायला पाहिजे, आणि तो कसा करायला पाहिजे, हेच बऱ्याच जणांना माहित नसते. त्यामुळे अनेकदा आर्थिक नियोजनाच्या पहिल्याच पायरीवर गणित चुकतं आणि नंतर ते सोडवायला कसरत करत बसावी लागते.

काही महिन्यांपूर्वी आमच्या ऑफिसमधे जोशी काका येऊन गेले त्यांचं उदाहरण घेऊ. पंधरा वर्षं हप्ते भरून कुठल्याश्या आयुर्विमा पॉलीसीचे त्यांना नुकतेच पाचएक लाख रुपये मिळाले होते. “मुलाच्या कॉलेजच्या शिक्षणाला एकरकमी मोठी रक्कम मिळेल असं सांगून एजंटनं तेव्हा ही पॉलिसी मला घ्यायला लावली,” काका सांगत होते. “पण आज लक्षात येतंय की त्या पैशात इंजिनीअरिंगचं एखादं वर्षही निघणार नाही.” काकांनी महागाईमुळे भविष्यात खर्च किती वाढू शकतात ह्याचा पॉलीसी घेताना विचार केला असता तर असा भ्रमनिरास पदरी पडला नसता.

पण जोशी काका हे प्रातिनिधिक उदाहरण आहे आपल्या सगळ्यांचेच. पुढील १०, २०, ३० वर्षात महागाईमुळे आपले दैनंदिन आयुष्यातील खर्च कसे वाढत जाणार आहेत, आणि त्यामुळे आपल्या जीवनशैलीवर कसे परिणाम होत जाणार आहेत ह्याचा अंदाज आपण बांधत नाही आणि म्हणून दीर्घकालीन गुंतवणुकीचं महत्त्व समजणं आपल्याला जड जातं.

आपल्या प्रत्येकाच्याच मनात भविष्याबद्दल काही स्वप्नं रंगवलेली असतात – सुखी कुटुंब, उच्चशिक्षित मुलं, प्रशस्त घर, गाडी आणि शेवटी निवांत सेवानिवृत्ती वगैरे वगैरे. अर्थातच प्रत्येक स्वप्नाची पूर्ती पुरेशा निधीवर अवलंबून असते.

कोणत्याही व्यक्तीसाठी आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजेच ही स्वप्नं किंवा उद्दिष्टे सुनिश्चित करणे, आणि अशा प्रत्येक स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्या त्या वेळी आपल्याला किती खर्च उचलावा लागणार आहे त्याचा अंदाज बांधणे होय. जर इथून आपण सुरुवात केली तर ह्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद आपण करून ठेऊ शकतो.

आता भविष्यात एखाद्या गोष्टीवर नक्की खर्च किती येईल हे अचूक सांगणं कोणालाच शक्य नाही. पण मागच्या लेखात म्हटल्या प्रमाणे ‘पूर्णपणे चूक असण्यापेक्षा थोडेतरी बरोबर असणे कधीही श्रेयस्कर’. त्यामुळे काही गृहितकं करून त्या आधारे अंदाज बांधून कृती ठरवणे आणि पुढे जशी नवनवीन माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे आपल्या नियोजनामध्ये फेरफार करण्याबाबत निर्णय घ्यावा हे योग्य.

भविष्यातील खर्चाचा अंदाज बांधताना आपल्याला दोन घटकांविषयी माहिती आवश्यक असते. सर्वात प्रथम, समजा ती गोष्ट आज करायची झाली तर आजच्या बाजारमूल्यानुसार किती खर्च येईल आणि दुसरे, महागाईचा किंवा चलनवाढीचा दर काय राहिल. म्हणजेच, आज सेवानिवृत्ती घेणाऱ्या व्यक्तीसाठी किती पुंजी पुरेशी असेल हे आधी शोधा आणि त्यावरून स्वतःची सेवानिवृत्ती जर २०-२५ वर्षांनी असेल तर महागाईच्या दरानुसार किती पुंजी जमवावी लागेल त्याचा अंदाज घ्या.

सध्या भारतातील महागाईचा दर जरी कमी असला तरी गेल्या ३० वर्षात तो सरासरी ७-७.५% दरम्यान होता असे दिसून येते. आपल्याला भविष्यातील १५-२० किंवा अधिक वर्षांचा आडाखा बांधायचा असल्यामुळे आपण दीर्घकालीन सरासरी दरवाढ गृहीत धरणे गरजेचं आहे.

म्हणजेच आपलं आर्थिक उद्दिष्टाचं गणित असं मांडता येईल : जर मी आज ६० वर्षांची असते तर सुमारे ५० लाखांची तरतूद निवृत्तीकाळासाठी पुरेशी ठरली असती. पण मला निवृत्तीला अजून २५ वर्षे आहेत तर ७% महागाईदर पकडून तेव्हा मला किती रक्कम लागेल?

आता ज्यांना चक्रवाढ गणिताची आकडेमोड माहितेय त्यांना ह्याचं उत्तर ५० लाख गुणिले (१.०७) चा २५वा घात असं करून शोधता येईल.

भविष्यातील खर्च = आत्ताचा खर्च X (१ + महागाई दर) ^ उद्दिष्टपूर्तीसाठी असलेली वर्षं

मात्र सर्वसामान्यांना ही आकडेमोड कठीण वाटू शकते. त्यामुळे ७-७.५% महागाईदराने आपले खर्च भविष्यात कसे वाढत जातील त्याचे सुलभ अंदाज खाली दिले आहेत

उद्दिष्टपूर्तीसाठी शिल्लक वर्ष

खर्चात किती वाढ होईल

४०% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या १.४ पट

१०

१००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या २ पट

१५

२००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या ३ पट

२०

३००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या ४ पट

२५

५००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या ६ पट

३०

७००% वाढ किंवा आत्ताच्या खर्चाच्या ८ पट

हे सुलभ अंदाज आहेत, त्यामुळे काटेकोरपणे अचूक नाहीत. पण आपल्याला योग्य उत्तराच्या जवळ नेणारे आहेत.

आता वरील उदाहरणात आपण हे सहज शोधू शकतो की आज सुखाने निवृत्त होण्यासाठी जर ५० लाख आवश्यक असतील तर २५ वर्षांनी निवृत्त होण्यासाठी त्याच्या सहा पट म्हणजेच सुमारे ३ कोटीची पुंजी आवश्यक ठरेल. ह्याचं गणित करून उत्तर काढलं तर महागाईदराच्या ७% किंवा ७.५% गृहीतकानुसार रुपये २.७-३ कोटी येतं. बापरे!

जेव्हा आपल्यातला प्रत्येक जण महागाईच्या दीर्घकालीन परिणामांविषयी सजग होईल आणि त्यानुसार आर्थिक उद्दिष्टांचं मूल्यमापन करेल तेव्हाच आयुर्विमा पॉलीसी किंवा मुदतठेवी हे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कसे फोल आहेत ह्याचा अंदाज करू शकेल.

जाता जाता सांगायचं म्हणजे चार-पाच वर्षांपूर्वी जेव्हा जोशी काका पहिल्यांदा आम्हाला भेटले तेव्हाच आम्ही त्यांना ही गणितं समजावून त्यानुसार आर्थिक नियोजनाची घडी बसवण्यास मदत केली. मुलाच्या इंजिनीअरिंगच्या प्रवेशाच्या वेळीच पुढील ४ वर्षात होणाऱ्या खर्चाची तरतूद करून आज ते निश्चिंत आहेत. परवा बोलता बोलता मी गमतीनं त्यांना विचारलं ‘काय हो काका, जर इंजिनीअरिंग ऐवजी तुमच्या मुलाने विमानपायलट बनायचं ठरवलं असतं तर हो?’ त्यांनी हसून तो विषय तिथंच सोडून दिला 😊

— प्राजक्ता कशेळकर