स्त्रियांचे आर्थिक नियोजन

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. त्यानिमित्त आमच्या सर्वच स्त्री-वाचकांचे अभिनंदन. आजच्या काळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर जाताना दिसत आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम राहतानाच घराची जबाबदारी देखील तितक्याच लीलया उचलताना दिसतात. गेली अनेक वर्षे आर्थिक सल्लागार म्हणून काम करताना लक्षात आले की सर्वसामान्यपणे स्त्रिया आपल्या आर्थिक नियोजनात काहीशा मागे असतात. अर्थार्जन आणि आर्थिक नियोजन ही कामे कौटुंबिक आयुष्यात पुरुषांची मक्तेदारी असल्याचा एक समज नकळतच आपल्या समाजमनात रुजलेला आढळतो आणि स्त्रियादेखील त्यांच्यावरील इतर सर्व जबाबदाऱ्यांची ओझी पेलता पेलता आर्थिक नियोजनाकडे काहीसे दुर्लक्ष करतात. त्यात देखील एकट्या स्त्रियांची अवस्था अजूनच बिकट असते. या सगळ्या गोष्टींमुळे आजच्या महिला दिनानिमित्त खास महिलांच्या आर्थिक नियोजनाविषयीचा हा लेख.

सर्वात प्रथम, स्त्रियांसाठी आर्थिक नियोजन असे वेगळे काही असायला हवे का? जी आर्थिक नियोजनाची मुलभूत तत्त्वे सर्वांसाठी लागू होतात तीच स्त्रियांना देखील लागू होत असणार ना? याचं उत्तर नक्कीच ‘हो’ असं आहे, पण स्त्रियांना थोडा वेगळा विचारही करावा लागतो.

स्त्रिया आज अर्थार्जन करत असल्या तरी त्यांचे सरासरी उत्पन्न हे पुरुषांपेक्षा कमी असते. जागतिक पातळीवरील रिसर्च असे दाखवतो की समसमान काम करणाऱ्या, एकाच पदावरील स्त्री आणि पुरुषाच्या उत्पन्नात २०% चा फरक असतो. म्हणजेच कुठल्याही स्त्रीचे आयुष्यभरातील उत्पन्न हे तिच्या इतकेच शिकलेल्या आणि तिच्या एवढेच काम करणाऱ्या पुरुषापेक्षा कमी असते.

याउलट आकडेवारी असे दर्शवते की स्त्रियांचे सरासरी आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असते. स्त्रिया पुरुषांपेक्षा सरासरी सुमारे साडेतीन वर्षे जास्त जगतात. म्हणजेच एकीकडे उत्पन्न कमी आणि दुसरीकडे निवृत्तीपश्चात जास्त वर्षे काढायची अशी दुहेरी कसरत स्त्रियांना करायची असते. ज्या संसाधनाची कमतरता असते त्याचे नियोजन करण्याची तेवढीच जास्त गरज असते. या न्यायानुसार स्त्रियांसाठी आर्थिक नियोजन काकणभर जास्तच महत्त्वाचे ठरते.

तिसरी गोष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे स्त्रिया निर्णय घ्यायला वेळ लावतात, आर्थिक निर्णय त्यांना गुंतागुंतीचे वाटतात आणि मुळात असलेल्या ‘रिस्क नको’ दृष्टिकोनामुळे बँकेच्या मुदतठेवी किंवा LICच्या पॉलिसी अशा पारंपारिक प्रोडक्ट्स मधे अडकून पडलेल्या असतात. त्यामुळे त्यांना गुंतवणूक जोखीम आणि ती योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने घेण्याची गरज समजावून घेण्याची आवश्यकता असते.

चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकट्या स्त्रियांची. सध्या समाजात विविध कारणांमुळे एकट्या राहणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. जिथे नवरा बायको दोघेही कमावते आहेत तिथे डबल इंजिनची गाडी थोडी मागेपुढे करत शेवटी मुक्कामी पोचणार असते. पण जिथे स्त्री एकटी असते तिथे ही आर्थिक समीकरणं काहीशी जास्तच कठीण होतात. त्यातही ती स्त्री जर का सिंगल पॅरेन्ट असेल तर आर्थिक जबाबदारी अजूनच वाढलेली असते. अशा स्त्रियांना सर्व गोष्टी स्वतःच्या स्वतःच निभवायच्या असतात. त्यामुळे अशा सर्वच स्त्रियांनी स्वतः लक्ष घालून, वेळ घालवून आर्थिक शिस्त, बजेटिंग पासून ते गुंतवणुका, इन्शुरन्स आणि पोर्टफोलिओ ही आर्थिक नियोजनाची मुख्य अंग आत्मसात करून घेणं आवश्यक आहे.

पुढील काही टिप्स सर्वच स्त्रियांना उपयोगी पडू शकतील:

  • घराचे आर्थिक बजेट आखणे आणि ते पाळणे यावर लक्ष द्या. यामुळे खर्च मर्यादित राहायला मदत होईल.
  • घरगुती उत्पन्नाच्या किमान २५-३०% रक्कम दरमहा गुंतवणुकीसाठी बाजूला काढा. रिटायरमेन्ट आणि मुलांची शिक्षणं यासाठी या गुंतवणुकी वेगळ्या ठेवा.
  • नवऱ्याचे उत्पन्न जास्त असल्यास त्याला घरखर्चाचा मोठा वाटा उचलू द्या.
  • जमीन, घर अशी कुठलीही मोठी गुंतवणूक करायच्या वेळी नवऱ्यासोबत आपलेही नाव त्यात को-ओनर म्हणून लावून घ्या.
  • बँक अकाउंट किंवा इतर आर्थिक गुंतवणुकीत आपले नाव जॉइंट-ओनर किंवा नॉमिनी आहे ना याची खातरजमा करा.
  • कुटुंबातील सर्व कमावत्या व्यक्तींचा योग्य विमा काढलेला आहे ना ते पहा. नवऱ्याच्या विम्यात आपले नाव लाभार्थी आणि आपल्या विम्यात नवऱ्याचे नाव लाभार्थी ठेवा.
  • आयुर्विम्याव्यतिरिक्त संपूर्ण कुटुंबाचा मेडिक्लेम, अक्सिडेंट किंवा गंभीर आजारांसाठी विमा काढणे गरजेचे असते हे लक्षात घ्या.
  • आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे आणि त्यानुसार योग्य ठिकाणीच गुंतवणुकी करणे, तसेच आर्थिक जोखमींचा विचार करून योग्य विमा संरक्षण घेणे यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी विश्वासू आणि तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेण्यास संकोच करू नका. जितक्या कमी वयात तुम्ही हे करून घ्याल तेवढे तुम्हाला आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करणे सोपे होईल.

महिला दिन हे निमित्त असते सर्व स्त्रियांना आठवण करून देण्याचे की तुम्ही पुरुषांपेक्षा कुठल्याच बाबतीत मागे नाहीत. स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी देखील स्त्रियांनी तितकीच जागरुकता दाखवावी, तेवढेच आग्रही राहिले पाहिजे. All the best!

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *