OLYMPUS DIGITAL CAMERA

मुलांना अर्थसाक्षर बनवा!

नुकताच आम्ही आमच्या गुंतवणूक विषयक चर्चा करण्यासाठी म्हणूनच बनवलेल्या व्हॉट्सऍप ग्रुप मधल्या प्रत्येकाला प्रश्न विचारला की आपल्याला काय अजून नवीन करता येईल. त्यात अनेकांकडून एक महत्त्वाची सूचना आली की मुलांना योग्य वयातच गुंतवणूक विषयाचे प्राथमिक ज्ञान देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा दोष नक्कीच आहे की वैयक्तिक आर्थिक नियोजन किंवा गुंतवणूक विश्वाची साधी तोंडओळख देखील त्यात करून दिली जात नाही. त्यामुळे अगदी कॉमर्स, फायनान्स, इकॉनॉमिक्स अशा ‘आर्थिक’ विषयांमधून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली मुलं देखील या विषयी अनभिज्ञ आणि काही प्रमाणात अनुत्सुक देखील दिसतात, इतर विषयाचे शिक्षण घेतलेल्यांची तर बातच सोडा. अर्थातच अशा परिस्थितीमुळे महागड्या घोडचुका होण्याची शक्यता वाढते.

पालक म्हणून आपल्यातल्या प्रत्येकालाच असे वाटत असतं की आपल्या मुलांना जगात आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी सक्षम बनवलं पाहिजे. त्यासाठी त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आपण उचलतो. त्याचबरोबर गुंतवणूक विषयाची देखील प्राथमिक प्रशिक्षण त्यांना मिळते आहे ना हे बघणं गरजेचं आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी घडलेली एक छोटीशी गोष्ट आठवतेय. आमच्या ओळखीच्या दाते काकांनी गुंतवणुकीच्या संदर्भात फोन केला. म्युच्युअल फंडात पहिल्यांदाच गुंतवणूक करायची तर कशी करू, कुठे करू वगैरे विचारायला. मी थोडं फार काही बोललं असेन तोच ते म्हणाले, आमच्या घरी येऊन हे सगळं सांगशील का? त्यांचा इंजिनीरिंग करणारा मुलगा आणि लॉ शिकणारी मुलगी ह्या दोघांनी देखील गुंतवणुकीविषयीच्या गप्पा ऐकाव्यात, त्यात रस घ्यावा आणि शंका विचाराव्यात अशी त्यांची इच्छा होती. मग काय, एका शनिवारी संध्याकाळी त्यांच्या घरी झक्कास ३-४ तासांचा ‘डिनर-पे-चर्चा’ चा गुंतवणूक गप्पा हा कार्यक्रम रंगला.

तशीच माझी एक जवळची मैत्रीण. लहानपणाच्या आठवणी सांगत होती. छोट्या छोट्या गोष्टीतून वडलांनी कसं घडवलं ते. बारा वर्षांची होती तेव्हा तिच्या वडलांनी हातात पाच हजाराचा बेअरर चेक दिला आणि सांगितलं बँकेत जा आणि हे पैसे काढून आण. बँकेतून पैसे काढण्यासाठी काय काय करावं लागेल ते स्वतः शोधून काढायचं, बोर्ड वाचायचे, लोकांना विचारायचं, पैसे मोजून घ्यायचे आणि जपून घरी घेऊन यायचं, सगळं एकटीनं करायचं. पहिल्यांदा भीती वाटली म्हणाली, पण हळूहळू बँकेचे सगळे व्यवहार एकटीने करण्याचा सराव झाला. आत्मविश्वास वाढला. हे देखील महत्त्वाचे अर्थशिक्षणच. आज माझ्याकडे नोकरीसाठी अर्ज केलेल्यांच्या मुलाखती घेताना लक्षात येतं की असंख्य MBA झालेल्या मुलांना चेक कसा लिहायचा, तो बँकेत कसा भरायचा, बँकेत अजून कुठल्या सुविधा मिळतात वगैरे प्राथमिक गोष्टी देखील माहित नसतात.

अनेकांना हा प्रश्न पडतो की मुलांना ह्या अर्थशिक्षणाच्या गोष्टी कुठल्या वयात शिकवाव्यात. याचं एकचएक असं उत्तर देणं शक्य नाही. उदाहरणार्थ, जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बुफे यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी शेअर्स मधे गुंतवणूक सुरु केली. त्यांच्या मते त्यांचा गुंतवणूक प्रवास सुरु करायला खूप उशीर झाला. मात्र हे उदाहरण वाचताना लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचे वडील शेअर ब्रोकर होते आणि त्यांच्या ऑफिसमधील अनेक बारीकसारीक कामं वॉरेन यांच्या गळ्यात पडत असत. त्यामुळे त्यांचं अर्थशिक्षण आपसूकच होऊन गेलं. 

आपण अर्थशिक्षणाचे तीन प्रमुख टप्पे करू शकतो. पहिला टप्पा म्हणजे पैशाचं मूल्य, ते कमावण्यासाठी कष्ट करावे लागतात हे लक्षात घेणं, खर्च मर्यादित ठेवणं, बचतीची सवय लावणं, बजेट बनवणं आणि त्यानुसार खर्चाची आखणी करणं इत्यादी. याला आपण आर्थिक शिस्त म्हणू शकतो. हे आपण मुलांना अगदी लहानपणापासून शिकवू शकतो. ‘पिगी बँक’ किंवा खाऊचे पैसे साठवण्यासाठी एखाद्या डब्याची सोय करून बचतीची सवय लावता येते. महिन्याचं बजेट बनवताना मुलांना बेरजा करायला सांगून त्यात सामावून घेता येऊ शकतं. 

त्यानंतरचा टप्पा म्हणजे बँकिंग सिस्टीमची ओळख, ATM, क्रेडिट कार्ड, चेक, पासबुक, पैसे ठेवणे किंवा काढणे हे व्यवहार, स्वतःचं अकाउंट वापरण्याची सवय, मुदत ठेवी काढणं, बिलं भरणं, इन्शुरन्सचे नूतनीकरण, कुठल्याही कामासाठी बँकेशी पत्रव्यवहार, ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंग इत्यादी कामकाजात किंवा व्यवहारात उपयुक्त गोष्टी. साधारण १२-१३ वयापासून पुढे मुलांना ह्यांची माहिती करून देता येऊ शकते. अर्थात, त्यातील धोके कुठे आहेत, काय चुका होऊ शकतात, त्यांचे परिणाम काय होतील, आपली सही, आंगठा, ATM पिन किंवा पासवर्ड इत्यादींचं सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व हे देखील मुलांना सांगणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही काळाने मुलांना एकट्याने या गोष्टी करता येतील या दिशेने प्रयत्न असले पाहिजेत. शाळेत किंवा सोसायटीच्या काही कार्यक्रमात एखादा स्टॉल लावून वस्तूंची विक्री करणे, पैसे मोजून ठेवणे अशा क्रिया आणि नफा किंवा तोटा म्हणजे काय, ते कसे मोजावे इत्यादी गोष्टी शिकवता येऊ शकतात.  एखाद्या सहलीचा खर्च मोजायला लावून लहान लहान अनेक खर्चांची बेरीज मोठी रक्कम होते हे दाखवून देता येतं.

ज्याला आपण गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजन म्हणतो ती बऱ्यापैकी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्यामुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स इत्यादी विषयांचा परिचय मुलांना वयाच्या १६-१८ वयाच्या पुढे करणं चांगलं. गुंतवणूक परतावा म्हणजे काय, तो कसा मोजावा, गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्या प्रत्येकाचे फायदे-तोटे, महागाई किंवा चलनवाढ, त्याचे दूरगामी परिणाम, गुंतवणूक जोखीम आणि या क्षेत्रातील धोक्याची वळणे, कर्ज आणि ते कशासाठी घ्यावे / घेऊ नये अशा सर्व संकल्पनांना या वयात मुलांसमोर आपण मांडू शकतो. त्याच सोबत मुलांना आर्थिक वृत्तपत्र किंवा बातम्यांचं वाचन करण्यासाठी प्रवृत्त करता येऊ शकतं. त्यातून अनेक नवनवीन संज्ञांची ओळख होते आणि त्याविषयी स्वतः माहिती शोधणे या वयात शक्य असतं. आता तुमच्या आर्थिक सल्लागाराबरोबरच्या बैठकीत देखील तुम्ही त्यांना सामील करून घेऊ शकता. सुट्टीच्या काळात थोड्या काळासाठी लहानसा व्यवसाय करू दिल्यास मुलांना जबाबदारीची जाणीव होते, लोकांसमोर कसं बोलावं ते समजतं, विक्रीकौशल्य वाढतात, आणि पैसे कमावण्यासाठी कष्ट करावे लागतात ही जाणीव घट्ट होते.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *