थेट इक्विटी की म्युच्युअल फंड?

मध्यंतरी ‘झी मराठीच्या’ एका वाचकाने आमच्या वेबसाईटमार्फत संपर्क साधला. त्याचा प्रश्न होता ‘अमक्या कंपनीचे १००० शेअर्स ८००च्या भावाने घेतले आहेत, त्याचं आता काय करू?’ त्या कंपनीचे बाजारमूल्य शोधले तर लक्षात आलं की शेअरचा भाव ४५० झालाय, म्हणजे ६ महिन्यात ८ लाखाचे साडेचार लाख झाले होते. त्या कंपनीबद्दल माहिती दिली, पण त्याच बरोबर हे देखील सुचवले की ‘बाबा रे, असल्या नसत्या जोखमी अंगावर घेऊ नकोस, त्यापेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य दे.’

आम्हाला अनेक लोक विचारत असतात शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, कुठले शेअर्स घेऊ? अनेकदा कोणाच्या तरी सल्ल्याने सुरुवात केलेली असते. बाजारात तेजी असते, सगळेच शेअर्स वर जात असतात तेव्हा हे लोक खुश असतात. पण आपल्याला झालेल्या फायद्यात स्वतःच्या कौशल्याचा भाग किती आणि निव्वळ नशिबाचा भाग किती याचा बहुतेकांनी विचार केलेला नसतो.

इक्विटी शेअर्स मधे थेट गुंतवणूक करावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो. केल्यास कधी करावी? किती करावी? वगैरे त्याच्या अनुषंगाने येणारे प्रश्न. आमचा एक चांगला मित्र. अनिवासी भारतीय. पण गुंतवणूक आणि शेअर मार्केट यांचे जबरदस्त आकर्षण. त्याचा प्रश्न – म्युच्युअल फंड पाहिजेत कशाला, मीच माझा शेअर्सचा पोर्टफोलिओ बनवेन. त्यात काय कठीण आहे? कुठलेसे मोबाईल अॅप स्वतःचा शेअर्सचा पोर्टफ़ोलिओ बनवून देते आणि सगळ्या शेअर्स मधे तुमची गुंतवणूक विखरून करते, त्याने सांगितले. म्हणजे आपल्या मनासारखे पोर्टफोलिओ बनवता येतील.

हे सर्व ऐकताना थिअरीमधे फार छान वाटते. पण प्रत्यक्षात उतरवणं सर्वसामान्यांना कर्मकठीण आहे.

शेअर्स मधे थेट गुंतवणूक करण्याचा निर्णय घेताना पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की आपण स्वतः यासाठी किती अभ्यास करू शकतो? बव्हंशी लोकांचे नोकरी-व्यवसाय शेअरबाजाराशी संबंधित नसतात. नोकरीतील जबाबदाऱ्या, सांसारिक व सामाजिक जबाबदाऱ्या, आपले छंद आणि आवडी वगैरे गोष्टींमधून आपल्याला शेअर्सच्या अभ्यासाला कितपत वेळ मिळू शकतो? बऱ्याचदा ‘शेअर ट्रेडिंग’ म्हणजेच शेअर बाजारात थेट ‘गुंतवणूक करणे’ असा लोकांचा समज असतो.

शेअर बाजारात गुंतवणूक अथवा ट्रेडिंग करण्यासाठी पूर्णवेळ देणारे असंख्य लोक आहेत. बाजारातील ट्रेडिंग ही एक स्पर्धा आहे. दररोज सकाळी बाजार उघडल्यापासून ते दुपारी बंद होई पर्यंत काही लोक फायदा कमावतात तर काहींचे नुकसान होते. आपण जर थोडा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की दिवसभरात ज्या सर्वांनी नफा कमावला त्यांचा सगळा नफा, हा ज्या सर्वांनी नुकसान सहन केलं त्यांच्या सगळ्या नुकसानीएवढाच असतो. म्हणजेच कोणीतरी नुकसानीत गेल्याशिवाय कोणीतरी फायद्यात जाऊ नाही शकत. आता आपण आपले इतर उद्योगधंदे सांभाळून बाजारात ट्रेडिंग करत असू तर पूर्णवेळ त्यासाठी देणाऱ्या लोकांच्या तुलनेत आपलं फायद्यात राहण्याचं प्रमाण काय असेल? जास्त वेळा जिंकण्याची शक्यता कोणासाठी जास्त असेल?

हा लेख ‘झी मराठी दिशा’ मध्ये २० सप्टेंबर २०१९ ला प्रसिद्ध झाला.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं एक शास्त्र आहे. त्यानुसार शेकडो शेअर्स पैकी कुठले घ्यावेत, किती घ्यावेत, किती काळ ठेवावेत, कधी विकावेत अशा सगळ्या निर्णयांना अभ्यासाने उत्तरे शोधायची असतात. दीर्घकाळ असा अभ्यास करत राहिल्याने त्याचे ठोकताळे बनवता येतात, त्यातून कुठे लक्ष केंद्रित करावं आणि कशाकडे दुर्लक्ष करावं हे समजतं. त्यातून निर्णय घेताना लागणारी सातत्य आणि चिकाटी निर्माण होते आणि भावना काबूत ठेवता येतात. मग प्रत्येक छोट्या छोट्या निर्णयातून दीर्घकालीन लाभाच्या गुंतवणुकी होत असतात.

हे जर आपण करत नसू तर बाजारात नफ्याऐवजी तोटाच होण्याची शक्यता जास्त असते. शेअर बाजारात अशी म्हण आहे की घेतलेल्या शेअर्सचे मूल्य खाली गेले की माणूस ‘दीर्घकालीन गुंतवणूकदार’ बनतो! वर उल्लेख केलेल्या आमच्या वाचकाला जेव्हा मी त्यांनी घेतलेल्या शेअर्सचे विश्लेषण करून सांगितले (की तुमचा तोटा नजीकच्या भविष्यात भरून येण्याची सुतराम शक्यता नाही) तेव्हा त्याने ही ‘असू दे. मी लाँगटर्म इन्व्हेस्टर आहे’ म्हणून कळवले.     

म्युच्युअल फंडातून गुंतवणुकी करण्याचा मुख्य फायदा हा आहे की हे सगळे निर्णय घेण्यासाठी तिथे तज्ञ मंडळींची टीम सतत कार्यरत असते. तेथील फंड मॅनेजर फायनान्स विषयात उच्चशिक्षित आणि गुंतवणूक क्षेत्रात अनुभवी असतात. तसेच सेबीच्या काटेकोर नियमांमुळे सामान्य गुंतवणूकदारांचं हित जपलं जातं. तेथील गुंतवणुकी व त्याचं मुल्यांकन यात पारदर्शकता असते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर्स मधे पैसे घालणारे असंख्य लोक एकदा केलेली गुंतवणूक अनेक वर्षे सांभाळत बसतात. त्यात नियमित वाढती गुंतवणूक होते आहे असे सहसा दिसत नाही. अनेकांनी हा अनुभव घेतला असेल की आपण एखाद्या शेअर मधे ५०,००० रुपये गुंतवतो आणि ते वर्षा-दोन वर्षात दुप्पट होतात. मग आपण विचार करत बसतो की ‘अरेरे, अजून जास्त का नाही गुंतवले’. त्यामुळे जरी यश मिळाले तरी त्याचा आपल्या वित्तमत्तेवर जाणवण्याइतपत देखील परिणाम होत नाही. अशा प्रसंगी आमचे एक स्नेही म्हणायचे, ‘गोल्ड मेडल मिळालं, पण ‘गोल्ड’ नाही!’

म्युच्युअल फंडातील SIPची संकल्पना या समस्येवरील उत्तम तोडगा आहे. दरमहा नियमितपणे थोडी थोडी रक्कम गुंतवत राहिल्याने गुंतवणुकीत सातत्य राहतं आणि ती वाढती राहते. म्युच्युअल फंडात अगदी ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरु करता येऊ शकते आणि ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या न्यायानं कालांतराने एक मोठी पुंजी तयार करता येऊ शकते.

पण मग सर्वसामान्यांनी थेट शेअर्स मधे गुंतवणूक करूच नये का? तर तसे नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी शेअर्स मधे थेट गुंतवणूक करून अनुभव नक्कीच घ्यावा. मात्र सर्वात आधी आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करून आणि त्यासाठी लागणाऱ्या गुंतवणुकी करून, सर्व प्रकारचे आवश्यक विमे – त्यात आयुर्विमा आणि मेडिक्लेम सर्वात प्रथम – उतरवून वर शिल्लक राहिल तेवढेच उत्पन्न थेट शेअर्स मधील गुंतवणुकी करण्यास वापरावे. आपण थेट गुंतवणुकीत कितपत यशस्वी होतोय त्याचा किमान ३-४ वर्षे अंदाज घेऊन त्या गुंतवणुकी वाढवायच्या किंवा काय ते ठरवावे.

आकर्षक वाटलं तरी अननुभवी गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील थेट गुंतवणुकी हे एक धोक्याचं वळण आहे, याची प्रत्येकानेच खूणगाठ बांधून ठेवणे गरजेचं आहे.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

1 Comment

  • Resp Mam , I’m Kapil Kapse from Chikhali, Dist Buldana. I would like to invest money In Mutual Fund , Probably in SIP , I don’t have much idea about it, Will you plz help me regarding this , which plan will be best for me, for how long should I invest any many more questions I’m having

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *