गुंतवणूक, जोखीम आणि ड्रायव्हिंग…

शेअर बाजार म्हटलं कि जोखीम आली. पण बहुतेक सामान्य गुंतवणूकदार केवळ ‘सुखाचे सोबती’ असल्याप्रमाणे वागतात. सुखाच्या काळात, म्हणजेच बाजार वरवर जात असताना, गुंतवणूकदारांच्या तोंडी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असे शब्द असतात. पण दुःखाच्या काळात, म्हणजेच बाजारातील पडझडीच्या काळात, तेच ‘हम आपके है कौन?’ असं विचारायला लागतात. अशा चढउतारांना एक समस्या म्हणून नव्हे तर शेअर बाजाराचा गुणधर्म म्हणून स्वीकारले पाहिजे. हीच मार्केट मधील रिस्क किंवा जोखीम आहे, आणि तिला तोंड देण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे असते. 

‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ बाजार वरवर जात असताना गुंतवणूकदारांच्या तोंडी हेच गाणे असते

गेल्या आठवड्यात आपण बघितले की ही जोखीम टाळून खरेदी विक्रीच्या ‘अचूक योग्य वेळा’ साधणे कसे अशक्यप्राय आहे (वाचा: ‘ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!‘). ठीक आहे. पण मग २००७-०८ चा मार्केट क्रॅश असो किंवा २००९ मधील शेअर बाजाराने मारलेली वेगवान उसळी असो, आपण निरपेक्ष भावाने गुंतवणूक करत राहायची असा याचा अर्थ आहे का? ‘योग्य वेळ साधण्यासाठी’ वायफळ प्रयत्न नाही करायचे तर मग पडझडीची जोखीम सतत डोक्यावर बाळगत राहायचे का? अशा वेळी गुंतवणुकीचे मूल्य पडते त्याबाबत काय करावे? 

बाजारातील पडझडीच्या काळात, तेच गुंतवणूकदार ‘हम आपके है कौन?‘ विचारायला लागतात

शेअर बाजारातील गुंतवणुकीतील अनिश्चिततेकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन आणि योग्य पद्धतीने केलेलं आर्थिक नियोजन आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करत असतात. आपण आपल्या रोजच्या जीवनात असंख्य अनिश्चिततांचा सामना करत असतो. कळत न कळत आपण त्या जोखमी कशा निभवायच्या ते शिकलेलो असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर ड्रायव्हिंगचं देता येईल. भारतीय रस्त्यांवरून ड्रायव्हिंग करणे आणि शेअर बाजारातील जोखमी सांभाळणे यात बरेच साधर्म्य आहे. कसे ते पहा —

माझ्या पाच वर्षं जुन्या गाडीला अनेक ठिकाणी लहान लहान पोचे, ओरखडे पडलेले आहेत. आपण कितीही काळजी घ्यायचा प्रयत्न केला तरीही भारतात गाडी वापरताना असे पोचे, ओरखडे पडणं हे अपरिहार्यच गोष्ट आहे. अगदी जवळून जाणारी वाहनं, अचानक गल्लीतून बाहेर येणारे भरधाव दुचाकीस्वार, अरुंद गल्ल्या इत्यादींमधून चुकून माकून वाचलोच तर पार्क करून ठेवलेल्या गाडीवरसुद्धा कोणीतरी लिखाणाचा सराव करून जातो.

बाजारातील गुंतवणुकीतील जोखीम आणि रस्त्यावर वाहन चालवताना आपण घेतो ती जोखीम यात फारसा फरक नसतो. ज्याप्रमाणे रस्त्यावर एखादी अनपेक्षित, आकस्मिक नुकसानकारक घटना कुठल्याही पूर्वसुचनेशिवाय घडू शकते, तशाच प्रकारे बाजारात अनपेक्षित पडझडी होत असतात.

जर गाडी बाळगायची तर असे लहानसहान ओरखडे आणि पोचे पडण्याची जोखीम आपल्याला उचलावीच लागते. त्यावर आपले काहीच नियंत्रण नसते.

असेच पोचे आणि ओरखडे आपल्या इक्विटी गुंतवणुकीच्या मूल्यावर अधूनमधून पडत असतात. त्यातून सुटका नसते. या तात्पुरत्या पडझडी म्हणजे जणू काही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी भरायचे भावनिक मूल्य होय. ते वेळच्या वेळी भरत राहावे लागते. दरवर्षी निफ्टी त्याच्या उच्चान्कापासून किती पडतो याची गेल्या २५ वर्षांची आकडेवारी बघितली तर सरासरी १५-२०% पडझड होते असे दिसून येते. म्हणजेच वर्षातून एकदा अशी पडझड होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे.

यातून पहिला धडा काय शिकलो तर, शेअर बाजारात अधूनमधून तात्पुरती पडझड ही होतच असते. ती कोणीच आधी ओळखू शकत नाही आणि त्यापासून सुटकादेखील करून घेऊ शकत नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीचा लाभ मिळण्यासाठी बाजाररुपी देवाला वाहिलेला तो भावनिक नैवेद्य समजावा आणि या कारणासाठी गुंतवणुकीतील सातत्य मोडू नये.

पडझडी म्हणजे जणू शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी भरावे लागणारे भावनिक मूल्य होय.
प्रत्येक गुंतवणूकदाराला ते वेळच्या वेळी भरत राहावेच लागते.

आम्ही एकदा एका स्नेह्यांकडे गेलेलो असताना गाडी रस्त्याच्या कडेला सुरक्षित पार्क केली होती. दोन-तीन तासांनी परत निघालो बघतो तर गाडीला पाठीमागून दुसऱ्या गाडीची ठोकर बसलेली. कोणातरी ड्रायव्हरचा रस्त्यावरून वेगात जाताना ताबा सुटला होता आणि नेमकी आमची गाडी त्याच्या पुढ्यात सापडली. काय करणार? नशिबाला दोष देत आम्ही घरी आलो. मागाहून विचार करताना लक्षात आलं की अशाप्रकारचा अपघात आपण काही केल्या टाळू शकलो नसतो. मागे एकदा दुचाकी चालवताना मधेच एक कुत्रा आला आणि रस्त्यावर सपशेल लोटांगण घालायचा प्रसंग उद्भवला. एकदा एका झाडाची मोठी फांदी मोडून पुढ्यात पडली. म्हणजे एखाद सेकंदाने कपाळमोक्ष टळला.

रस्त्याकडेला सुरक्षित उभ्या केलेल्या गाडीला देखील अपघात होऊ शकतो.

अशा असंख्य अनपेक्षित, आकस्मिक, प्रचंड नुकसानकारक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्यांची आपल्याला काहीही पूर्वकल्पना मिळू शकत नाही किंवा त्या टाळण्याचा कुठलाही उपाय आपल्याकडे नसतो. त्यातल्या त्यात समाधानाची एकच गोष्ट म्हणजे अशा घटना अपवादात्मक असतात किंवा फार क्वचित घडणाऱ्या असतात. 

इक्विटी बाजारातदेखील अशा घटना घडण्याचा संभव असतो — म्हणजेच अनपेक्षित, आकस्मिक, अतार्किक कारणांमुळे मोठे नुकसान होण्याची जोखीम असते. पण त्यावर आपला काहीच ताबा नसतो. अचानक कुठलीही वाईट बातमी येऊन मार्केटला झोपवून टाकू शकते. अशा वेळी बाजारातील मूल्यांकनं आकर्षक आहेत, भविष्यातील वृद्धीदर आश्वासक राहील वगैरे तज्ज्ञांची वक्तव्य कुठे विरून जातात कळतही नाही. त्यामुळे दुसरा धडा हा घ्यायचाय की प्रत्येक रिस्क आपल्याला कळू शकत नाही आणि त्यामुळे कधीनाकधी आपल्याला प्रचंड मोठ्या पडझडीचा सामना करावा लागू शकतो. त्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे.

पण म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्या हातात काहीच नाही का? तर तसे नाहीये. सगळ्याच प्रकारच्या जोखमींना एकाच रंगात रंगवण्या आधी थोडं थांबून विचार केला पाहिजे. अनेक रिस्क अशा आहेत की ज्या पूर्णपणे आपल्या हातात आहेत. आपले ड्रायव्हिंगचे उदाहरण लक्षात घेतले तर अतिवेगाने गाडी चालवणे, उतावीळपणे किंवा निष्काळजीपणे गाडी चालवणे, झोप येत असताना गाडी चालवणे, ड्रायव्हिंग करताना फोन वर गप्पा मारणे, किंवा मेसेज टाईप करणे ह्या सगळ्या धोकादायक गोष्टी आहेत. त्या सगळ्या पूर्णपणे आपल्याच ताब्यात असूनसुद्धा आपण अनेकदा असे प्रकार करतो. या आपल्याला माहित असलेले धोके आहेत, आणि ते न घेणं — त्यामुळं निर्माण होऊ शकणारी जोखीम काढून टाकणं — हा शहाणपणा आहे.

त्याचप्रमाणे इक्विटी मार्केट मधील गुंतवणुकीत देखील कुठले धोके आपण आधी ओळखू शकतो त्यांचं नियोजन करणे फार महत्त्वाचे आहे. या विषयीच्या अनेक वर्षांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे कि आपण आधी ओळखू शकतो आणि त्यामुळे नियोजन करू शकतो असे धोके हे आपली मानसिकता आणि वर्तणूक — पराकोटीची घबराट किंवा नैराश्य आणि अतिप्रचंड हाव किंवा अधाशीपणा — यातून निर्माण होत असतात. या गोष्टींमुळे विचलित न होता जर आपण गुंतवणुकीचे निर्णय घेत राहिलो तर आपली दीर्घकालीन उद्दिष्ट नक्कीच साध्य करू शकतो.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *