चलती का नाम … गुंतवणूक!

गेल्या आठवड्यात आपण बघितलं बाजारातील जोखीम आणि आपल्या आयुष्यातील इतर व्यवहारातील जोखीम यांच्यात अनेक साम्य आहेत (वाचा: ‘बाजार, गुंतवणूक आणि जोखीम…’). आपले स्वतःचे वाहन जसं रस्त्यावर चालवायला बाहेर काढलं की त्यावर कधी ना कधी लहान सहान ओरखडे हे पडणारच असतात. त्यापायी आपले लक्ष विचलित होऊ देण्यापेक्षा ज्या गोष्टींवर आपला पूर्ण ताबा आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं, तिथं चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे योग्य आहे.

याच उदाहरणाचा आपण थोडा खोलात जाऊन विचार केला तर असं लक्षात येईल की ड्रायव्हिंगचा अनुभव आपल्याला गुंतवणुकीविषयक योग्य दृष्टिकोन तयार करण्यास मदत करू शकतो. उदाहरणार्थ, ड्रायव्हिंग करताना तुम्हाला अचानक समोर काय आणि कधी येईल हे आधीच सांगणं कठीण असतं. मधेच एखादा स्पीडब्रेकर येतो, तर कधीतरी एखादा खड्डा पुढ्यात येतो, कुठेतरी एखादं कुत्रं आडवं येतं, तर कुठे एखादा ट्रकवाला बिनधास्त न बघता रिव्हर्स मारत असतो. लांबच्या प्रवासात कधी मुसळधार पावसातून किंवा दाट धुक्यातून गाडी चालवावी लागते, तर कधी दिवे बंद असलेल्या अंधाऱ्या रस्त्यांमधून जावे लागते. ड्रायव्हिंग करताना अशा अनेक प्रकारच्या अनपेक्षित घटना घडू शकतात याची आपली मानसिक तयारी झालेली असते. त्यामुळे त्या त्या वेळी जाणीवपूर्वक विचारही न करता — ज्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणू शकतो — आपण मार्ग काढत जातो. आपण त्यालाच ‘ड्रायव्हिंगचं कौशल्य’ असं म्हणतो.

ड्रायव्हिंगचा अनुभव आपल्याला गुंतवणुकीविषयक योग्य दृष्टिकोन तयार करण्यास मदत करू शकतो.

गुंतवणुकीच्या प्रवासात देखील असेच अनपेक्षित खाचखळगे येत असतात. त्याची मानसिक तयारी असणं फार गरजेचं आहे, नाहीतर बावचळून जायला, घाबरायला होऊ शकतं. दुर्दैवाने, जशी ड्रायव्हिंग करण्यासाठी लायसेन्सची गरज असते, आणि त्यासाठी प्रत्येकाला एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक धडे गिरवावे लागतात, तसं गुंतवणुकीच्या बाबतीत होत नाही. त्यामुळे एक तर बव्हंशी लोक फक्त ‘बचत’च करत राहतात आणि त्यालाच ‘गुंतवणूक’ समजतात, किंवा ‘गुंतवणूक’ सुरु करणारे हौशे, नवशे एखाद दोन धक्के बसले की ‘ये अपने बस की बात नही हैं’ असं म्हणून बाहेर पडतात.

ड्रायव्हिंगसाठी अनुभवी व्यक्तीकडून प्रशिक्षण आणि नंतर परीक्षा देऊन लायसन्स मिळवावे लागते. गुंतवणुकीच्या क्षेत्रात अशी कुठलीच पूर्वतयारी न करता उतरल्याने अनपेक्षित खाचखळग्यांना तोंड द्यायची आपली मानसिक तयारी होत नाही

आपण कुठल्याही प्रवासाला गाडी घेऊन निघतो तेव्हा उद्दिष्ट असतं योग्य वेळेत ठरलेल्या ठिकाणी सुखरूप पोचण्याचं — रस्त्यावर आपल्या सोबत धावणाऱ्या इतर गाड्यांना मागे टाकून पहिला नंबर मिळवण्याचं नाही! काही ड्रायव्हर रेसिंग केल्यासारखी रस्त्यावर गाडी पळवतात, पण हे म्हणजे अपघाताला आमंत्रणच. हे आपण मान्य करतो. पण अनेक जण गुंतवणूक करताना ‘इतरांपेक्षा मला परतावा जास्त मिळतोय का’, ‘मी घेतलेल्या म्युच्युअल फंडांच्या योजना परताव्या देण्यात नंबर १ आहेत का’, ‘अमक्या योजनेत इतका परतावा मिळाला मग माझ्याकडच्या योजनेत का नाही’ यावर नको तितके चर्वितचर्वण करताना दिसतात. आर्थिक नियोजनाचं प्राथमिक उद्दिष्ट हे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक जबाबदाऱ्या वेळच्या वेळी पार पाडता याव्यात हे असते — तुम्हाला जगातील पहिल्या क्रमांकाचा इन्व्हेस्टर किंवा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवणे नाही! जसं रस्त्यावरून गाडी चालवताना आपण रेसिंग करत नाही, तसंच गुंतवणूक करताना देखील पहिल्या क्रमांकाचा हव्यास ठेऊ नये.

आर्थिक नियोजनाचं प्राथमिक उद्दिष्ट हे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक जबाबदाऱ्या वेळच्या वेळी पार पाडता याव्यात हे असते — तुम्हाला जगातील पहिल्या क्रमांकाचा इन्व्हेस्टर किंवा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवणे नाही !

तिसरी गोष्ट. रस्त्यावरून फार वेगाने गाडी पळवणे म्हणजे धोका पत्करणे हे आपण जाणतो. महामार्गांवर फार वेगाने गाड्या हाकणाऱ्यांना सावध करण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर पाट्या लावलेल्या असतात ‘अति घाई, संकटात नेई‘ वगैरे. पण गुंतवणुकीच्या प्रवासात मात्र अनेक लोक अव्वाच्यासव्वा परताव्याच्या हव्यासापोटी चुकीची जोखीम उचलायला तयार असतात. जसे रस्त्यावर गाडी पळवताना जास्त वेग म्हणजे जास्त जोखीम, तसंच गुंतवणुकीच्या जगात जास्त परताव्याची आश्वासनं म्हणजे जास्त जोखीम.

ड्रायव्हिंग करताना अतिवेगाचा मोह टाळला पाहिजे तसाच अतिनिवांत जाणे देखील चुकीचेच. तसेच गुंतवणूक करताना खूप जास्त किंवा खूप कमी जोखीम घेऊन चालत नाही.

गंमत म्हणजे असंख्य लोक याच्या पूर्णपणे विरुद्धदेखील वागताना दिसतात — योग्य तेवढी रिस्क गुंतवणुकीत घेत नाहीत. फक्त मुदतठेवी आणि इन्शुरन्स पॉलिस्या अशात पैसे ठेवतात. म्हणजे पैसे कधी मिळणार, किती मिळणार हे पूर्णपणे सुनिश्चित, पण त्यात चलनवाढीहुन जास्त परतावा मिळत नाही आणि आपलं दीर्घकालीन नुकसानच होतं याचा अजिबात विचार नाही. म्हणजेच, जर अजिबात धोका नको म्हणून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर कोणी गाडी पहिल्या गिअरमधे चालवायचं ठरवलं तर काय होईल? ते त्यांच्या मुक्कामी नक्कीच सुखरूप पोचतील, पण कधी पोचतील ते सांगता येणार नाही. आणि इतर गाडीवाल्यांचे शिव्याशाप सहन करावे लागतील ते वेगळेच. त्यामुळे, गुंतवणूक करताना जर अजिबात जोखीम घ्यायची नाही असं ठरवलं तर आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या योग्य वेळी पूर्ण करता येतील याची शाश्वती राहात नाही. त्यामुळे गुंतवणुकीत थोडीतरी रिस्क घ्यावीच लागणार याची खूणगाठ मनाशी बांधावी, पण ‘अति तेथे माती‘ हे लक्षात ठेवून.

अजून एक महत्त्वाची गोष्ट. समजा तुम्ही मुंबईहून पुण्याला गाडीने जात आहात. १५० किमी अंतर आहे. तुम्ही किती वेळात पोचू शकाल? एखाद्या दिवशी फार ट्रॅफिक नसला तर तुम्ही सव्वादोन-अडीच तासात जाऊ शकाल, नाहीतर तीन-साडेतीन तासही लागू शकतात. आता दुर्दैवाने तुम्हाला रस्त्यात मोठा ट्रॅफिकजॅम लागला तर पाच-सहा तास देखील लागू शकतात. यातला नक्की कुठला अनुभव नेमका आपल्या वाट्याला येणार आहे ते प्रवास सुरु करायच्या आधीच सांगणं अशक्य आहे. आपण आखलेल्या प्रवासाच्या वेळापत्रकाचा असा बोजवारा उडाल्याचा अनुभव आपण प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेला असतो. आपल्या अशा प्रवासात वेळेचं गणित पुढेमागे होऊ शकते तसेच ते गुंतवणुकीच्या प्रवासात देखील होऊ शकते. आपण सगळ्या योग्य त्या गोष्टी केल्यानंतरही अपेक्षित परतावा दिसण्यासाठी आपल्या कल्पनेपेक्षा जास्त काळ लागू शकतो. तसे झाल्यास संयम न सोडता वाट बघण्याची तयारी ठेवणे फार महत्त्वाचे असते.

ड्रायव्हिंग करणं किंवा रस्त्यावरून प्रवास करणं हे आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. ते जितक्या सहजपणे आपण सांभाळतो, त्यातील अनिश्चितता किंवा धोक्यांना तोंड देतो ते गुंतवणुकीच्या प्रवासापेक्षा फारसे वेगळे नाही. अर्थात त्याचा पुरेसा अभ्यास करणं किंवा तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन — किमान सुरुवातीच्या काळात — घेणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे नवशिके ड्रायव्हर सातत्याने सराव केल्याशिवाय सफाईदार ड्रायव्हिंग करू शकणार नाहीत तसेच थोडी तरी जोखीम घेऊन गुंतवणूक केल्याशिवाय आपण एक चांगले ‘गुंतवणूकदार’ बनू शकणार नाही.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *