गुंतवणूक आणि चुकीच्या कल्पना

समाज माध्यमं आणि वृत्तपत्र, टीव्ही अशी पारंपरिक माध्यमांमधून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अर्थसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य समाजापर्यंत अनेक संकल्पना पोचल्या आहेत. खरेतर या सगळ्या माहितीचा भडीमार सातत्याने सुरु आहे. मात्र या एकमार्गी संभाषणामुळे गुंतवणूकदारांच्या सवयी कितपत बदलत आहेत? तर फारशा नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण आपण गेल्या आठवड्यात बघितले – गुंतवणूक क्षेत्रातील ग्राहकाभिमुख असणाऱ्या वितरक, एजन्ट किंवा रिलेशनशिप मॅनेजर अशांच्या गैरप्रथा आणि त्यातून गुंतवणूकदारात निर्माण होणारी अनास्था आणि उदासीनता. त्याचबरोबर दुसरे मला जाणवलेले एक कारण म्हणजे गुंतवणूकदारांच्या मनातल्या अनेक चुकीच्या कल्पना.

हा लेख ‘झी मराठी दिशा’ मध्ये ५ जुलै २०१९ ला प्रसिद्ध झाला.

गेल्याच महिन्यात आपल्या अर्थविचारच्या एका वाचकांनी आमच्या वेबसाइटवरून संपर्क साधला. फोनवर बोलणं झालं, प्राथमिक माहितीची देवाण-घेवाण झाली, आर्थिक नियोजनाच्या पायऱ्या त्यांना समजावून सांगितल्या वगैरे. बोलता बोलता त्यांनी सांगितलं ‘ते रिटायरमेंट प्लॅनिंग वगैरेची फारशी गरज नाही, माझा प्रॉव्हिडन्ट फंड आहे आणि दोन एंडोमेन्ट पॉलिस्या घेऊन ठेवल्यात. पुढल्या महिन्यात काही मुदतठेवी संपताहेत आणि बँकेत व्याज कमी मिळतंय तेव्हा तेवढ्या रकमेची गुंतवणूक कशी करायची तेवढं सांगा.’ आपल्याला निवृत्तीकाळासाठी नियोजन करण्याची काहीही गरज नाही किंवा प्रॉव्हिडन्ट फंड किंवा इन्शुरन्स पॉलिस्या यातून ती गरज सहज भागेल ही त्यांच्यासारखीच चुकीची कल्पना अनेकांच्या मनात असते. एक आर्थिक सल्लागार म्हणून काम करताना असे अनेक गोड गैरसमज ऐकायला मिळतात आणि मनोरंजन होत असतं. त्यातील काही ह्या लेखात मांडायचा प्रयत्न करते आहे. अजून कुठल्या अशा ‘चुकीच्या कल्पना’ तुम्हाला लक्षात आल्या असतील तर आम्हाला नक्की कळवा.

१. मी तर तरुण आहे, निवृत्तीसाठीचे नियोजन करायला मला भरपूर अवकाश आहे — तिशीच्या आतल्या लोकांच्या मनात ही चुकीची भावना मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ते दोन गोष्टी लक्षात घेत नाहीत. जेवढ्या लवकर आपण दीर्घकालीन गुंतवणुकी सुरु करू तेवढा जास्त वेळ त्यांना वृद्धी साठी मिळतो आणि मोठा निधी तयार होण्यास मदत होते. तसेच आजच्या तरुण पिढीला निवृत्तीकाळ सोडाच, तर नोकरी सोडावी लागल्यामुळे किंवा दोन नोकऱ्यांतील काळासाठी देखील आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. आजकाल वयाच्या ३५व्या वर्षी नोकरी जाऊ शकते आणि नवीन प्रशिक्षण घ्यायची वेळ येऊ शकते. पूर्वीसारखे पंचविशीपर्यंत शिक्षण आणि त्यापुढे साठीपर्यंत सलग नोकरी अशी शाश्वती राहिली नाहीये.

२. गुंतवणुकीसाठी माझ्याकडे पैसे नाहीत – ही सबब मी महिना रू १०,०००/- कमाई करणाऱ्यांपासून ते रू १५०,०००/- पगार असणाऱ्यांपर्यंत अनेकांकडून ऐकली आहे. अर्थातच ही लंगडी सबब आहे. वैयक्तिक अर्थकारणाचे एक महत्त्वाचे मूलभूत तत्त्व हे आहे कि ‘मासिक उत्पन्नातून आधी पुरेश्या गुंतवणूकी करा आणि उरलेली रकमेत खर्च भागवा’. मात्र आजकाल सर्वत्र ग्राहकांच्या चंगळवादाला अति प्रोत्साहन दिले जात असल्याने अनेकांच्या गरजांपुढे त्यांचे उत्पन्न पुरे पडत नसल्याचे दिसून येते. असे होणे टाळले पाहिजे.

३. प्रॉव्हिडन्ट फंड किंवा इन्शुरन्स पॉलिस्या यातून माझ्या निवृत्तीकाळातील सर्व आर्थिक गरजा पूर्ण होतील – असं सांगणाऱ्यांनी महागाईचा आपल्या मासिक खर्चावर दीर्घकालीन परिणाम कसा होतो याचा विचार केलेला नसतो. वयाच्या साठाव्या वर्षी यातून जे काही ५०-६० लाख मिळतील त्यात आपले त्यापुढील किमान २५-३० वर्षांचे सगळे खर्च भागतील असा भाबडा विचार त्यामागे असतो.

४. मी ब्रोकरकडे डिमॅट व शेअर ट्रेडिंग खाते काढले आहे, म्हणजे मी गुंतवणूक करतो – शेअर्स मध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे सतत उलाढाल करून किंमतीतील चढउतारांनुसार नफा कमवायचा प्रयत्न करणे. हा सट्टा होय. जरी ते शेअर्स मधील व्यवहार असले तरी त्याला ‘गुंतवणूक’ म्हणणे चुकीचे आहे. असे ट्रेडिंग करून उत्पन्न मिळवण्यासाठी पूर्णपणे त्याला वाहून घेणे गरजेचे ठरते. म्हणजेच, तुम्ही पूर्णवेळ शेअर बाजारात काम करत असाल तरच यात नफा होऊ शकतो.

५. माझ्या डोक्यावर एवढं कर्ज आहे, मी कशी गुंतवणूक करू – क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्ज असेल तर ते नक्कीच आधी पूर्ण फेडणे गरजेचे आहे मात्र गृहकर्जाला हा नियम लागू होत नाही. याविषयी मागील एका लेखात चर्चा केली होती.

६. मला शेअर बाजाराबद्दल, गुंतवणूक क्षेत्राबद्दल काहीच माहिती नाही, मी आधी सगळं शिकून घेईन आणि नंतर गुंतवणूक सुरु करेन – एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी फायनान्स किंवा गुंतवणूक क्षेत्राचा अभ्यास असण्यापेक्षा गुंतवणुकीच्या योग्य सवयी जास्त महत्त्वाच्या ठरतात. उगीच कालापव्यय न करता गुंतवणूकीची प्रक्रिया लवकर सुरु करून तिच्या वाढीस जास्तीत जास्त वर्षे उपलब्ध करून देणे ही त्यातली एक सवय. त्यामुळे मूलभूत काही गोष्टी योग्य असल्याची खात्री करून सुरुवात करणे महत्त्वाचे.

७. मी एक डॉक्टर (किंवा अजून कुठला व्यावसायिक) आहे, मी कधीच निवृत्त होणार नाही, मग मी कशाला गुंतवणूक करू – अर्थातच ही हास्यास्पद कल्पना आहे. कितीही कर्तबगार व्यावसायिक असला तरी वाढत्या वयानुसार आपल्या फिटनेसबद्दल अशाश्वती वाढत जाते. निवृत्तीचे वय कमी जास्त होऊ शकेल, पण शेवटपर्यंत कार्यरत राहणे कोणालाच शक्य नाही. तेव्हा दीर्घकालीन गुंतवणुकी हव्यातच.

८. माझी वयाची पन्नाशी आली, उशीर झाला, आता कुठे निवृत्तीसाठी आर्थिक नियोजन, गुंतवणुकी करू – आताच्या काळात बहुतेकांसाठी जीवनमर्यादा ८५-९० वर्षांच्या असतात त्यामुळे पन्नाशीतील व्यक्तीला देखील पुढील ३५-४० वर्षांचा विचार करायची गरज असते. ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ संत कबीरांनी या ओळीत सांगितल्याप्रमाणे झालेला उशीर विसरून गुंतवणुकींना अजून उशीर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

९. गुंतवणूक करणे फार ‘कठीण’ किंवा ‘क्लिष्ट’ आहे – आपण थोडासा वेळ यासाठी द्यायचे ठरवल्यास आपल्याला गुंतवणूक क्षेत्र अजिबात क्लिष्ट किंवा कठीण वाटणार नाही. त्यासाठी काही मूलभूत तत्त्व पाळली पाहिजेत आणि गरज पडल्यास योग्य व्यक्तीकडून सल्ला घेण्यास संकोच केला नाही पाहिजे. आताच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यात हे फारच सोपे झाले आहे. अशा अनेक चुकीच्या कल्पना, किंवा आत्मवंचना म्हणा, जनसामान्यांना सुयोग्य गुंतवणूक पर्यायांपासून लांब ठेवत असतात. यातले अनेक गैरसमज निवृत्तीकाळासाठीच्या आर्थिक नियोजनाबाबत आहेत. तो एक मोठा विषय आहे आणि त्याचा सविस्तर आढावा आपण पुढील काही आठवड्यात घेऊ. बाकी गुंतवणुकांबाबत आपल्या धारणा, आपले पूर्वग्रह, कितपत योग्य आहेत हे आपण शोधायचा प्रयत्न केला तर नक्कीच योग्य पर्याय आणि सवयी आपण अंगीकारून आपल्या कुटुंबाची दीर्घकालीन आर्थिक उन्नती साधू शकतो.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *