गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला?

दोनेक आठवड्यांपूर्वीची गोष्ट असेल. एका स्नेह्यांकडील घरगुती समारंभात एकांशी भेट झाली. इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा झाल्या, काय करता वगैरे झाले. गुंतवणूक सल्लागार आहे म्हटल्यावर त्यांनी एकदम प्रश्न केला ‘माझ्याकडे आत्ता लाखभर रुपये आहेत, कुठली स्कीम सर्वात चांगली आहे गुंतवणूक करायला?’ त्यांची अपेक्षा होती मी त्यांना रेडीमेड काहीतरी योजना सुचवावी. मात्र माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा होता ‘यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी काहीच माहिती नाही तर यांना सल्ला कसला देणार?’ ही माझी समस्या मांडताना ‘एका व्यक्तीचं अन्न दुसऱ्या व्यक्तीसाठी विष ठरू शकतं’ या अर्थाची इंग्रजी म्हण मी त्यांना सांगितली.

माझा अनुभव असा आहे की बऱ्याच लोकांना ‘गुंतवणूक सल्लागार’ म्हणजे नक्की काय या विषयी मोठे गैरसमज असतात. त्यांना वाटतं की हे लोक फक्त पैशांची गुंतवणूक करून देतात किंवा फक्त श्रीमंत लोकांनाच त्यांची गरज असते. प्रत्यक्षात एक गुंतवणूक सल्लागार त्याच्या क्लाएन्टना अनेक प्रकारे मदत करत असतो आणि श्रीमंत लोकांपेक्षा त्यांची जास्त गरज मध्यमवर्गीयांना असते. कारण जेवढी आपली संसाधनं मर्यादित तेवढे त्यांचे नियोजन जास्त महत्त्वाचे.

एका गुंतवणूक सल्लागाराचे काम हे त्याच्याकडे आलेल्या क्लाएन्टला ‘अर्थसाक्षर’ करण्यापासून सुरु होतं. दुर्दैवाने आपल्याकडील फायनान्स किंवा इकोनॉमिक्स विषय घेऊन पदवीधर झालेल्यांमध्ये देखील अर्थसाक्षरतेचा अभाव अनेकदा दिसून येतो, तर डॉक्टर, इंजिनिअर वगैरेंची बातच सोडा. गुंतवणुकीचे विविध पर्याय कुठले, त्यांची वैशिष्ट्य काय, गुंतवणूक आणि बचत यातील फरक, त्यातील जोखीम काय, ती कशी सांभाळायची, चलनवाढीचा परिणाम काय असतो, चक्रवाढ म्हणजे काय, त्याचा फायदा कसा करून घेता येतो, गुंतवणूक करताना काय उद्दिष्टे ठेवावीत, किती परताव्याची अपेक्षा वास्तववादी आहे इत्यादी अनेक मुलभूत गोष्टी एक गुंतवणूक सल्लागार त्याच्या क्लाएन्टना समजावून सांगत असतो.

पुढचं काम म्हणजे क्लाएन्ट आणि त्याच्या कुटुंबासाठी भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी मदत. बहुतेक लोकांना दीर्घकालीन विचार करण्याची सवय किंवा त्यासाठी लागणारी आकडेमोड कशी करावी याचे ज्ञान नसते. आपली रिटायरमेंट किंवा मुलांची शिक्षणं यासाठी भविष्यात किती निधी आवश्यक असेल याचा शास्त्रशुद्ध विचार फार कमी लोक करतात. ‘आत्ता चाललंय ना व्यवस्थित, पुढचं पुढं बघू’ असा झापडबंद विचार ते करतात. गुंतवणूक सल्लागार तुम्हाला भविष्याचं आर्थिक नियोजन करण्यास मदत करतो.

गुंतवणूक सल्लागार त्याच्या क्लाएन्टना अनेक प्रकारे मदत करत असतो आणि श्रीमंत लोकांपेक्षा त्यांची जास्त गरज मध्यमवर्गीयांना असते. कारण जेवढी आपली संसाधनं मर्यादित तेवढे त्यांचे नियोजन जास्त महत्त्वाचे.

आपल्या कुटुंबासाठी बनवलेला असा आर्थिक नियोजनाचा आराखडा आपल्याला भविष्यात कुठल्या कारणासाठी कुठल्या वर्षी नक्की किती रक्कम लागेल हे सांगतो. नक्की काय केले असता आपल्यावरील भविष्यातील सर्व आर्थिक जबाबदाऱ्या आपण व्यवस्थितपणे पार पाडू शकू याचा अंदाज त्यामुळे आपल्याला येतो.

तिसरी पायरी म्हणजे तुमची जोखीम पेलण्याची क्षमता जोखणं. शेअर मार्केट जेव्हा सुसाट पळत असतं तेव्हा प्रत्येकालाच त्यात अधिकाधिक गुंतवणूक करावीशी वाटत असते. पण जेव्हा ते मंदावतं किंवा कोसळतं तेव्हा काय? अशी ही गुंतवणुकीतील जोखीम पेलण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे क्षमता कितीही असली तरी जोखीम घ्यायची गरज किती आहे ते देखील तपासून बघावे लागते. गुंतवणूक सल्लागार तुम्हाला अनेक प्रश्न विचारून गुंतवणुकीतील जोखमीविषयी तुमचा दृष्टीकोन समजावून घेत असतो.

चौथी पायरी म्हणजे तुमचे विमा संरक्षण. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, तुमच्यावरील आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या व्यक्ती, तुम्ही काढलेली कर्जे इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन किती आयुर्विमा संरक्षणाची गरज आहे त्याचा अंदाज तुमचा गुंतवणूक सल्लागार तुम्हाला देत असतो. त्याचबरोबर वैद्यकीय विमा, अपघात विमा, गंभीर आजार विमा, घराचा विमा किंवा इतर प्रकारच्या विम्याविषयीदेखील तो मार्गदर्शन करत असतो. बाजारात असंख्य विमा योजना उपलब्ध असतात. त्यातली कुठली घ्यावी, कुठली घेऊ नये आणि का हे आपला गुंतवणूक सल्लागार सांगत असतो.

या सगळ्या पायऱ्या पार केल्या म्हणजे मग आपण गुंतवणूक कुठे करायची या प्रश्नापाशी पोचतो. आपली आर्थिक परिस्थिती, उत्पन्न आणि खर्च, आधी केलेल्या गुंतवणुकी, इन्कम टॅक्सच्या सवलती, आर्थिक उद्दिष्टं, हाती असलेला कालावधी, जोखीम घेण्याची क्षमता या सर्व घटकांचा सर्वंकष विचार करून गुंतवणूक सल्लागार तुम्हाला योजना सुचवत असतो. त्या योजनांमध्ये किती किती गुंतवणूक करावी, किती काळापर्यंत ती चालु ठेवावी, ती बाहेर काढून घ्यायला कधी सुरुवात करावी याचे मार्गदर्शन देखील तुम्हाला तो करतो.

सर्वात शेवटचे म्हणजे आपण बनवलेला आर्थिक नियोजनाचा आराखडा कालांतराने नियमितपणे सुधारत राहावं लागतं. उद्दिष्टांमध्ये बदल करावे लागतात. आपण केलेल्या गुंतवणुकी आपल्या गृहीतकांनुसार परतावा देताहेत की नाही यावर लक्ष ठेवावे लागते. त्यात काही बदल करायचे का, असल्यास नक्की काय बदल करावेत, याची उत्तरे तुम्हाला तुमच्या गुंतवणूक सल्लागाराकडून मिळत असतात.

हे वाचून तुम्हाला कल्पना येईल की अचानक कोणी ‘कुठल्या योजनेत पैसे गुंतवू?’ असं विचारलं की आमच्यासारख्यांना किती त्रास होतो. गुंतवणूक सल्लागाराचे काम हे व्यापक आणि सर्वसमावेशक असते. तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी थोडीफार तरी माहिती असल्याशिवाय गुंतवणूक सल्लागार तुम्हाला योग्य सल्ला नाही देऊ शकत.

स्वतंत्र व्यावसायिक गुंतवणूक सल्लागार अशा सल्ल्यासाठी फी आकारतात, त्यामुळे अनेक जण ‘कशाला पैसे खर्च करा, करू आपले आपणच’ असा विचार करतात. त्याहून चुकीचे म्हणजे ते इन्शुरन्स एजंट किंवा बँकेतील मॅनेजर अशा लोकांचा ‘फुकट’ मिळणारा सल्ला घेतात. मात्र जगात कुठलीच गोष्ट फुकट नसते. तुमच्या गळ्यात बांधलेल्या महागड्या प्रॉडक्ट मधून ते त्यांची फी वसूल करत असतात.

गुंतवणूकदाराच्या दृष्टीने स्वतंत्र सल्लागाराच्या सल्ल्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ, भारतात सुमारे ४० म्युच्युअल फंड आहेत, त्यांच्या सर्व योजनांची संख्या चार हजारच्या पुढे आहे. त्याचप्रमाणे भारतात २४ आयुर्विमा कंपन्या कार्यरत आहेत, त्यांच्याकडील सर्व प्रकारच्या विमा योजनांची संख्यादेखील सहज हजारावर जाईल. साहजिकच नक्की कुठल्या योजना निवडाव्यात याविषयी कोणीही गोंधळून जाऊ शकतो. अभ्यासू सल्लागार तुम्हाला या सगळ्या भूलभुलैयातून वाट काढायला मदत करतो.

अनेक जण इंटरनेटवरून या विषयातील माहिती गोळा करून स्वतःचे गुंतवणुकीचे निर्णय स्वतः घ्यायचा प्रयत्न करतात. हे नक्कीच स्पृहणीय आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे इंटरनेट तुम्हाला प्रचंड माहिती देते. पण माहितीचा महापूर म्हणजे ज्ञान नव्हे. जर माहितीच्या सहाय्याने आपण योग्य निर्णयापर्यंत पोचू शकलो तर ठीक, पण त्यामुळे उलट गोंधळच वाढला तर ते बरोबर नाही. एक चांगला गुंतवणूक सल्लागार तुम्हाला चुकीच्या किंवा गोंधळात टाकणाऱ्या कोलाहलातून मार्ग काढून योग्य निर्णयांकडे घेऊन जातो. या सर्वांपलीकडे एक महत्त्वाचे काम तुमचा गुंतवणूक सल्लागार बजावत असतो ते म्हणजे तुमची गुंतवणूकीची शिस्त आणि संयम राखणे, कठीण समयीदेखील तुमचा आत्मविश्वास जागृत ठेवणे. कारण गुंतवणूकदारांच्या वर्तणुकीवरील संशोधनातून असे लक्षात आले आहे की केवळ धरसोड वृत्ती आणि स्वतःच्या निर्णयांविषयी आत्मविश्वासाचा अभाव यांमुळे त्याचं सर्वात जास्त नुकसान होत असतं. त्यामुळे आपली गरज ओळखा आणि योग्य फी भरून व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेण्यास लाजू नका.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *