बोनसचे नियोजन

आर्थिक नववर्षाची सुरुवात करून देणारा एप्रिल महिना बहुसंख्य नोकरदारांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. त्यांचे वार्षिक अप्रायजल झालेले असल्यामुळे साधारण याच सुमारास त्यांना त्यानुसार वार्षिक बोनस मिळणार असतो व पुढील वर्षासाठीची पगारवाढ ठरणार असते. बोनस किंवा तत्सम इतर कुठलाही एकरकमी मोठा निधी हातात आला, की त्याच्या खर्चाला वाटा फुटायला वेळ लागत नाही. तसे होऊ नये यासाठी अशा ‘लम्प-सम’च्या गुंतवणुकीचा विचार प्रत्येकाने आधीपासूनच करणे योग्य असते.

आपण दरमहा गुंतवणूक करतच असतो. ती सहज होऊन जात असते आणि त्याचा आपण विचार आणि नियोजन केलेले असते. (नसेल केलेले तर ते आधी करा. वाचा: आधी कळस, मग पाया) मात्र एखादी मोठी रक्कम एकदम मिळाल्यावर त्याचे काय करावे, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. इक्विटी म्युच्युअल फंडात टाकावेत का, एकदम टाकावेत की हळूहळू टाकावेत, आपण इक्विटीमध्ये गुंतवले आणि नंतर मार्केट पडले तर, त्यापेक्षा बँकेच्या मुदतठेवीत ठेवावेत का, की चालू असलेले कुठले कर्ज फेडण्यासाठी त्याचा वापर करावा, असे अनेक प्रश्न पडू शकतात.

प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाची परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे याबाबतीत खरे तर वैयक्तिक पातळीवर आपापल्या गुंतवणूकसल्लागाराचा सल्ला घेणे कधीही जास्त सयुक्तिक ठरते. आपण याबाबतीतील काही प्रमुख पर्याय पाहुया.

सर्वात प्रथम म्हणजे गृहकर्ज सोडून इतर कुठलेही कर्ज काढलेले असेल, उदाहरणार्थ, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डावरील कर्ज इत्यादी, आणि त्यात लवकर परतफेडीवर दंड नसेल तर त्यांच्या परतफेडीला प्राधान्य दिले पाहिजे. कारण ही सर्व कर्जे महागडी असतात आणि भविष्यातील अनिश्चित परताव्याच्या मागे लागण्यापेक्षा आजचा नक्कीचा खर्च कमी करणे कधीही चांगले असते.

मोठ्या निधीच्या गुंतवणुकीच्या बाबतीत एक मोठी जोखीम जी आपण लक्षात घेत नाही, ती म्हणजे ‘निष्क्रियता.’ आपण ‘नंतर करू’ असे म्हणून कालापव्यय करत राहतो. मग पैसे बचतखात्यात पडून राहतात किंवा खर्च होतात. त्यामुळे आपल्याला झेपेल एवढीच जोखीम पोर्टफोलिओमध्ये कशी राहील, त्याचा विचार करून डेट-इक्विटीचा तोल सांभाळून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

गृहकर्ज मात्र याला अपवाद ठरू शकते. कारण ते आपल्याला मिळू शकणारे सर्वात स्वस्त कर्ज आहे आणि त्यावर करवजावटही मिळते.

बऱ्याचदा लोक असे पैसे ‘सुरक्षित’ ठेवण्याच्या उद्देशाने ‘त्याचे नक्की काय करायचे ते ठरवेपर्यंत मुदतठेवीत ठेवू’ असे म्हणून बँकेच्या मुदतठेवीचा पर्याय निवडतात. मात्र ही तात्पुरती उपाययोजना असू शकते, कारण बँकेच्या मुदतठेवी दीर्घकाळ केल्यास महागाई आणि कर यांच्या एकत्रित प्रभावामुळे त्या मूल्यनाशक ठरतात. (वाचा: मुदतठेवींचे गणित)

त्यामुळे आपल्याला हे ठरवले पाहिजे, की हा निधी आपल्याला दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आरक्षित ठेवायचा आहे की लघुकालीन किंवा आकस्मिक कारणांसाठी. पूर्वी सुचवल्याप्रमाणे जर आपला आकस्मित निधी (इमर्जन्सी फंड) तयार नसेल तर त्या उद्दिष्टासाठी हा निधी वापरणे नक्कीच उत्तम ठरेल. म्हणजेच म्युच्युअल फंडातील एखाद्या लिक्विड प्रकारातील योजनेत कधीही वापरता येईल अशा प्रकारे साठवणे. सुमारे ८-१० महिन्यांचा खर्च भागू शकेल एवढा तरी निधी अशा इमर्जन्सी फंडामध्ये ठेवणे उपयोगी ठरते. (वाचा: ‘आकस्मिक निधी’ हाताशी हवाच!)

परंतु इमर्जन्सी फंडही तयार आहे आणि त्यात भर घालायची आवश्यकता नाही, असे असेल तर मग हे पैसे आपल्या दीर्घकालीन इक्विटी योजनांमधील गुंतवणुका वाढवण्यासाठी वापरता येऊ शकतात. परंतु आपण एकदम मोठी रक्कम गुंतवली आणि नंतर मार्केट पडले तर?

एकरकमी निधीचा वापर: प्राधान्यक्रम
१. गृहकर्जाव्यतिरिक्त वाहनकर्ज, वैयक्तिक कर्जाची परतफेड
२. अशी कर्जे नसल्यास इमर्जन्सी फंड तयार करण्याची हीच ती वेळ
३. इमर्जन्सी फंड असल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीस प्राधान्य द्यावे

ही ‘मार्केट पडले तर…’ची जोखीम आपण इक्विटी योजना निवडतानाच घेतलेली असते, म्हणूनच दीर्घकालीन करायच्या गुंतवणुकाच आपण तेथे करत असतो. ही जोखीम का घ्यावी आणि त्याचा कसा विचार करावा याचे विवेचन मागच्या काही लेखांत केले आहे (वाचा: गुंतवणुकीचं तंत्र आणि मंत्र). १०-१२ वर्षे किंवा जास्त कालावधीचा विचार करून आपण गुंतवणूक करत असलो, तर खरे बघायला गेल्यास आपण एकरकमी गुंतवणूक केली काय किंवा दरमहा थोडी थोडी केली, फारसा फरक पडणार नसतो. 

मात्र आपल्या एकंदर गुंतवणुकीपेक्षा फार मोठी रक्कम गुंतवायची असल्यास मानसिक दडपण येऊ शकते. अशा वेळी ती रक्कम लिक्विड फंडात ठेवून दरमहा किंवा प्रत्येक आठवड्याला थोडी थोडी अशा पद्धतीने १२-१८ महिन्यांत इक्विटी फंडात गुंतवू शकतो. आता कोणी असा प्रश्न उपस्थित करू शकतो, की आपला १२-१८ महिन्यांचा गुंतवणूककाळ संपला आणि मग मार्केट पडले तर? अशा कुतर्कांना कधीच अंत नाही. कारण मार्केट पडेल अशा भीतीने आपण वाट बघत बसलो आणि मार्केट वरवरच जात राहिले तर?

शेवटी एक गोष्ट मान्य करून आपल्याला पुढे जावे लागेल ती म्हणजे आपण कुठलाही निर्णय घेतला तरी आपल्याला भविष्यात कदाचित ‘अरेरे, असे कशाला केले? तसे का नाही केले?’ अशा पश्चात्तापाच्या विचाराशी सामना करावा लागू शकतो. नजीकच्या भविष्यात मार्केट कसे वागेल, याचा अचूक अंदाज सातत्याने कोणीच कधी बांधू शकला नाही. त्यामुळे आपल्याला झेपेल एवढीच जोखीम पोर्टफोलिओमध्ये कशी राहील, त्याचा विचार करून आणि डेट-इक्विटीचा तोल सांभाळून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

मोठ्या निधीच्या गुंतवणुकीच्या बाबतीत एक मोठी जोखीम जी आपण लक्षात घेत नाही, ती म्हणजे ‘निष्क्रियता.’ अनेकदा आपण ‘चूक झाली तर’ किंवा ‘मार्केट पडले तर’च्या तावडीत सापडून काहीच निर्णय न घेणे हा सोपा पर्याय निवडतो किंवा ‘नंतर करू’ असे म्हणून कालापव्यय करत राहतो. मग पैसे बचतखात्यात पडून राहतात आणि खर्च होतात किंवा मुदतठेवीत गुंतवले जातात. तेव्हा आधीपासूनच ‘बोनसची रक्कम कशी आणि कुठे गुंतवायची’ याचा विचार पक्का करून ठेवा.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *