गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास

“हॅलो!”

“नमस्कार, काय म्हणताय डॉक्टर?”

“काही नाही, जरा माझ्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचं होतं. मी तो रोज बघतोय, त्यात काहीच एक्सायटिंग होत नाहीये. ते येस बँक, टाटा मोटर्सचे शेअर्स बघा ना, एका महिन्यात ५०%-६०% पळाले. आपल्याला काही बदल करायला हवेत का? ‘इक्विटी एक्स्पोजर’ वाढवायला हवेय का?”

गेल्याच महिन्यात आलेला हा एका क्लाएन्टचा हा फोन मला काहीसा स्तिमित करून गेला. साडेतीन-चार वर्षांपूर्वी ह्या डॉक्टर साहेबांचं आर्थिक नियोजन करून त्यानुसार गुंतवणुकी सुरु केल्या होत्या, आणि त्या व्यवस्थित चालु होत्या. २०१८ मधे बाजार नरमगरम राहूनसुद्धा २०१९ मधे पोर्टफोलिओमधे चांगला ९.५-१०% सरासरी वार्षिक परतावा दिसत होता. पण साहेबांची तक्रार होती की काहीच ‘एक्सायटिंग’, ‘हॅपनिंग’ होत नाहीये. मित्रमंडळीत फुशारकी मारायला गुंतवणुकीतील परतावा हा अजून एक विषय त्यांना हवा होता की काय नकळे.

गुंतवणुकीचा प्रवास कधीच आपल्यासाठी मौजेचा, ‘एक्सायटिंग’ किंवा चित्तथरारक असू नये. कारण त्यातून केवळ तणाव, गोंधळ आणि घबराट निर्माण होत असतात आणि शेवटी पदरात काही पडेल याची शाश्वती नसते.

कुठल्याही क्लाएन्टबरोबर काम करायला सुरुवात करताना आम्ही एक पथ्य पाळण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीलाच दोन तासाची मिटिंग घेऊन गुंतवणूक म्हणजे काय, ती का, कुठे, कशी करावी, त्यातील जोखीम म्हणजे काय, ती कमी करण्यासाठी आपण काय करतो, आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवावीत आणि आर्थिक नियोजनाकडे बघण्याचा दृष्टीकोन काय ठेवावा इत्यादी प्राथमिक गोष्टी त्यात समजावून सांगतो. वास्तववादी विचार केल्यास इक्विटी म्युच्युअल फंडातून आपल्याला किती परतावा मिळायला हवा किंवा मिळू शकतो हा देखील त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असतो. अनेकांचा समज इक्विटी म्हणजे ‘महिन्याला ८-१०% परतावा, वर्षभरात पैसे डबल’ असा काहीतरी अवास्तव असतो. त्यांना वास्तवाची जाणीव करून देणे गरजेचे असते. आमचे डॉक्टरसाहेब त्यातलेच.

प्रत्यक्षात बघायला गेलं तर गुंतवणूक करणं किंवा त्यातून श्रीमंत होणं ही एक संथ, आणि त्यामुळे कंटाळवाणी, प्रक्रिया आहे. आपण नियोजनाचा प्लान बनवताना, आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करताना कदाचित कोणी स्वप्नं बघू शकेल, आपण काय काय साध्य करू शकतो त्याच्या शक्यता कोणाला रोमांचकारी वाटू शकतात. पण श्रीमंत होण्याच्या कल्पना आणि त्यासाठीची प्रक्रिया यात एक मोठा फरक असतो. तो प्लान प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया संथ व संयत असते.

तसं बघायला गेलं तर गुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत व्हायची प्रक्रिया एकदम सरधोपट आहे आणि कोणीही आचरणात आणू शकेल इतकी सहज आहे. त्याची मुख्य तत्त्वं अशी आहेत-

  • कमाईपेक्षा खर्च कमी ठेवा. काटकसर करा.
  • महिन्याच्या उत्पन्नातील किमान २० टक्के तरी बचत करा.
  • सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक करा.
  • कर्जाची परतफेड करा. जास्तीची कर्ज घेऊ नका.
  • गुंतवणुकीचा योग्य नियोजन करा. झेपेल तेवढीच जोखीम घ्या. नजीकच्या काळासाठी आणि दीर्घकालीन, दोन्ही प्रकारच्या गुंतवणुका करा.

आपण टीव्ही चॅनेल किंवा चित्रपटात गुंतवणुकीसंदर्भात जे जे बघतो – शेअर्सची सतत खरेदीविक्री, सेकंदासेकंदाला मार्केटचं वरखाली होणं, विविध तज्ञांची निरनिराळी मते, त्यांचे मतभेद, सतत होणारा ब्रेकिंग न्यूजचा मारा इत्यादी गोष्टी – ते आपल्याला अॅड्रेनलीन पुश देतात. त्या सगळ्या घडामोडी आपल्याच सभोवती घडत असल्याची भावना निर्माण करतात. पण त्यातून यशस्वी गुंतवणुकी होत नसतात. गुंतवणुकीचा प्रवास कधीच आपल्यासाठी मौजेचा, ‘एक्सायटिंग’ किंवा चित्तथरारक असू नये. कारण त्यातून केवळ तणाव, गोंधळ आणि घबराट निर्माण होत असतात आणि शेवटी पदरात काही पडेल याची शाश्वती नसते.

एका महिन्यात ५०%-६०% वाढणारे येस बँक किंवा टाटा मोटर्स सारखे शेअर्स अनेक असतात, पण दर महिन्याला ते बदलत असतात. आपल्याला त्याचा फायदा होण्यासाठी पुढल्या महिन्यात कुठले शेअर्स पळतील ते आधीच शोधता येणं गरजेचं आहे. असे पुढल्या महिन्यात पळणारे शेअर्स शोधणारे लोक हे अमृत किंवा परीस शोधायला बाहेर पडलेल्या लोकांपेक्षा काही फार वेगळे नाहीत.

याउलट गुंतवणुकीची पूर्वनिर्धारित प्रक्रिया जेव्हा मार्केटमध्ये पडझड होते आणि इतर लोक भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत असतात, तेव्हा देखील आपल्याला आपल्या नियोजित मार्गाने उद्दिष्टांपर्यंत पोचण्यासाठी मदत करत असते. त्याचबरोबर, जेव्हा आपली आर्थिक गणितं सुयोग्य पद्धतीने मांडलेली असतात तेव्हा त्यात सतत गुंतून पडायची गरज राहत नाही आणि आपले आयुष्य पूर्णपणे जगायला आपल्यापाशी वेळ आणि उत्साह राहतो.

हे सगळं डॉक्टर साहेबांना समजावून सांगितलं आणि म्हटलं, “तुम्हाला मजा, एक्साईटमेंट, थरार हवाय नं? त्यासाठी गोव्याला जा आणि एखादा कॅसिनो गाठा. तुमच्या गुंतवणुकी तुम्हाला पुढल्या ८-१० वर्षात करोडपती बनवू शकतील, पण त्यांना रोज बघत बसणं नक्कीच कंटाळवाणे असेल. त्यांच्यात काही ‘एक्सायटिंग’ होईल अशी अपेक्षा ठेवू नका.” आमच्या डॉक्टर साहेबांना हे सांगितलेलं पटलं, तुम्हाला पटतंय का?

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *