आता नको, मग नको

गेल्याच आठवड्यात एकीचा फोन आला. आर्थिक नियोजनाबद्दल बोलायचंय म्हणाली. आमच्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये काम करते आणि त्यानंच माझा फोन नंबर दिल्याचं तिनं सांगितलं. गप्पा झाल्या, भेटायचं कधी ते ठरलं, पण त्यापुढे तिनं जे सांगितलं ते ऐकून मी विचारात पडले. ती म्हणाली दीड वर्षापासून आता फोन करू, मग फोन करू म्हणत होते आणि काहीना काही कारणानं राहून जात होता. दुसरी एक मैत्रीण महिन्याआड स्वतः फोन करून ‘हे सगळं फार महत्त्वाचं आहे ग. मी तुला पुढल्या आठवड्यात नक्की भेटायला येईन’ असं आश्वासन गेलं वर्षभर देतेय. गेली ६-७ वर्षं या क्षेत्रात काम करून एक गोष्ट जी प्रकर्षानं जाणवली आहे ती म्हणजे बहुतेक सर्वच लोक ‘आर्थिक नियोजन’ हा विषय आला की चालढकल करतात. त्यासाठी कारणं अनेक आहेत.

चालढकल करणं (procrastination) ही एक सवय आहे. आपण आयुष्यात अनेक गोष्टींची चालढकल करत असतो. परीक्षेचा अभ्यास आदल्या रात्री जागून करणं, इन्शुरन्स पॉलिसीच्या शेवटच्या दिवशी नूतनीकरणासाठी पळापळ करणं, ३१ जुलैला टॅक्स रिटर्न भरायला बसणं किंवा दरवर्षी २०-२२ मार्चनंतर करबचतीच्या गुंतवणुकीचे पर्याय शोधायला सुरुवात करणं, ही सगळी त्याचीच उदाहरणं.

Check out what David Laibson, professor of economics at Harvard University, has to say on ‘procrastination’

कुठलीही गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजन करताना वेळ हा घटक फार महत्त्वाचा असतो. आपण गुंतवणुकीला वाढण्यासाठी जेवढा जास्त वेळ देऊ शकतो, तेवढा जास्त परतावा त्यातून मिळू शकतो. म्हणजेच लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात केल्यास उद्दिष्टपूर्ती सहजसाध्य होते.

आर्थिक नियोजनाची चालढकल आपल्या कुटुंबासाठी फार खर्चीक ठरू शकते. एका सोप्या उदाहरणातून हे स्पष्ट होईल. समजा, गार्गी आणि मैत्रेयी नावाच्या दोन समवयस्क मैत्रिणी वयाच्या २५व्या वर्षी एकाच दिवशी नोकरीला लागल्या. गार्गीनं पहिल्या पगारापासून दरमहा ५,००० रुपये बचत करायला सुरुवात केली आणि दरवर्षी ६०,००० रुपयांप्रमाणे पुढील १० वर्षांत सहा लाख रुपये गुंतवले. त्यापुढे तिनं नवीन गुंतवणूक करणं थांबवलं. याउलट मैत्रेयीनं पहिली १० वर्षं चालढकल केली आणि वयाच्या ३५व्या वर्षांपासून दरमहा ५,००० रुपये गुंतवायला सुरुवात केली. गार्गीप्रमाणेच तिनंही पुढील १० वर्षांत सहा लाख रुपये गुंतवले आणि पुढची गुंतवणूक थांबवली. वयाच्या साठीला सेवानिवृत्तीच्या वेळी त्या दोघींच्या गुंतवणूक परताव्यात किती फरक पडला असेल? दोघींनाही गुंतवणुकीवर वार्षिक ८ टक्क्यांनी परतावा मिळत गेला, असं धरल्यास गार्गीच्या खात्यात ६३ लाख रुपये जमा झाले असतील तर, मैत्रेयीच्या खात्यात फक्त २९ लाख रुपये म्हणजेच बाकीचे घटक कायम ठेवता, १० वर्षांच्या चालढकलीमुळे मैत्रेयीचं ५० टक्क्यांहून जास्त नुकसान होईल.

चालढकल करणं (procrastination) ही एक सवय आहे. आपलं मोठं नुकसान होऊ शकतं, हे कळूनही आपल्याकडून चालढकल होत असते. कळतंय पण वळत नाही म्हणतात ना ते हेच!

आपलं मोठं नुकसान होऊ शकतं, हे कळूनही आपल्याकडून चालढकल होत असते. कळतंय पण वळत नाही म्हणतात ना तेच हे! गंमत म्हणजे याचं मानसशास्त्रीय कारण काय या विषयावर अनेक तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे. त्यातून असं लक्षात आलं, की आपला मेंदू सर्व कामांची वेळेनुसार दोनच कप्प्यांत वर्गवारी करत असतो- ‘आता’ आणि ‘नंतर’. म्हणजे सोमवारी, पुढल्या आठवड्यात, पुढल्या महिन्यात वगैरे करायची सगळीच कामं ‘नंतर’ कप्प्यात जातात. ‘आता’ करायच्या कामांच्या तुलनेत ‘नंतर’ म्हणजेच भविष्यात कधीतरी करायच्या कामांचं फारसं दडपण आपला मेंदू घेत नाही. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला जराशीदेखील कठीण, कष्टप्रद, गुंतागुंतीची वाटते तिला आपला मेंदू ‘नंतर’ कप्प्यात टाकून देतो. त्यामुळेच आपलं ‘जिमला जायचंय? १ तारखेपासून नक्की, ‘डाएटिंग सुरू करायचंय, पुढल्या आठवड्यापासून करू’, ‘वार्षिक चेकअपसाठी डेन्टिस्टकडे जायचा दिवस आला, जाऊ पुढच्या शनिवारी’ असं सारखं होत असतं.

 ‘नंतर’ कप्प्यातली कामं महत्त्वाची आहेत आणि आपण ती करायची आहेत, असं आपण स्वतःला बजावत राहतो, पण त्यातली बहुतांश कामं अनिवार्य होईपर्यंत त्याच कप्प्यात पडून राहतात. आर्थिक नियोजन, गुंतवणूक, जमाखर्च आणि त्यासाठीची आकडेमोड या गोष्टी बऱ्याच लोकांनी कुठेतरी मनात कठीण, क्लिष्ट, अवघड आहेत, असं ठरवून टाकलेल्या असतात. त्यामुळे त्या ‘नंतर’ कप्प्यातून ‘आता’ कप्प्यात कधीच येत नाहीत. दुसऱ्या असंख्य सोप्या, सवयीच्या, आरामाच्या, आवडीच्या गोष्टी आपण करत राहतो आणि ‘आर्थिक नियोजन ना? नक्की बघू पुढच्या महिन्यात’ असं स्वतःलाच बजावत राहतो.

चालढकलीच्या समस्येतून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या मनाला थोडंसं फसवायची गरज आहे

या चालढकलीच्या समस्येतून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या मनाला थोडंसं फसवायची गरज आहे. ‘३ इडियट्स’मधला आमीर खान ऊर्फ रॅन्चो नाही का सांगायचा ‘आपलं मन घाबरट असतं. त्याला शांत ठेवण्यासाठी फसवावं लागतं. कितीही कठीण प्रसंग आला तरी तुमच्या मनाला बजावत राहा All is well!’ तसंच काहीसं! तुम्ही तुमच्या मनाला सांगा ‘आज फक्त दहा मिनिटं- फक्त दहाच मिनिटं- आर्थिक नियोजनासाठी घालवू’. तुम्ही ‘फक्त १० मिनिटं’ म्हटलंत की तुमचा मेंदू हे क्लिष्ट, कठीण वाटणारं काम ‘नंतर’ कप्प्यातून ‘आता’ कप्प्यात आणायला तयार होईल. हे तुम्ही साधलंत तर निम्मी फत्ते झालीच म्हणून समजा. ताबडतोब कागद-पेन घ्या किंवा संगणक सुरू करा आणि आपल्या आर्थिक नियोजनाबद्दल मनात येणारे विचार, प्रश्न, शंका, अपेक्षा, कल्पना हे नुसतं लिहून काढायला सुरुवात करा. किंवा फोन उचला आणि एखाद्या अनुभवी व्यक्तीशी बोला. एकदा सुरू केलंत, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल, की आधी वाटलं होतं, तेवढ्या काही या गोष्टी  क्लिष्ट वा कंटाळवाण्या नाहीत.

या लेखमालेत डिसेंबरमधील काही लेखांत आर्थिक उद्दिष्टं कशी निश्चित करावीत, त्यासाठी गुंतवणूक किती करावी यासाठीची सुलभ अंदाजकोष्टकं दिली होती. आकडेमोडीशिवाय उत्तरं शोधण्यासाठी त्यांचा उपयोग करा. तुमच्या अनेक प्रश्नांना इंटरनेटवर उत्तरं सापडू शकतात ती बघा आणि तरीही ज्या शंका असतील, त्यांचं निरसन अनुभवी व्यक्तींकडून करून घेता येईल. एक अगडबंब वाटणारी गोष्ट कृतिशील छोट्या छोट्या भागात विभागली जाताच सहजसाध्य वाटू लागेल.

आर्थिक नियोजनाबाबत सततची चालढकल हे मानसिक अस्वस्थतेचं कारण ठरू शकतं. आपण कमावतो आहोत ते पुरेसं आहे का, पुरेशी बचत करत आहोत का, खर्च कमी करायची गरज आहे का, योग्य गुंतवणूक करतो आहोत की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला नियोजनामुळे मिळू शकतात आणि भविष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी योग्य वेळी पुरेसा निधी उपलब्ध होणार आहे याची खात्री आपल्याला मनःशांती मिळवून देते.

पैसा हे एक साधन आहे. त्याच्या सुयोग्य नियोजनानं आपण आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. त्यासाठी गरज आहे ती थोड्या मानसिक शिस्तीची.

चला तर मग! संत कबीरांचा उपदेश ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ आर्थिक नियोजनालादेखील लागू करुया आणि मनाच्या ‘नंतर’ कप्प्यात राहून गेलेला हा विषय ‘आता’ कप्प्यात आणुया!

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *