गुंतवणूक आणि आयुर्विम्याची गल्लत

दीर्घकालीन गुंतवणुकीप्रमाणेच आयुर्विमा हे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील आर्थिक गणिताचं एक अविभाज्य अंग आहे. खरं तर आयुर्विमा ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे, की समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अर्थसाक्षरतेची सुरुवात इथून करायला हवी.

पुरेशा विमासंरक्षणाचा अभाव असंख्य कुटुंबांसाठी समस्या ठरू शकतो.

दोनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. शाळेतील माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आला. तिच्या घराजवळ राहणाऱ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचा दुर्दैवानं अपघाती मृत्यू झाला होता. घरात ती, तिची वृद्ध सासू आणि शाळेत जाणाऱ्या दोन मुली होत्या. घरात कमावतं दुसरं कोणीच नाही. त्या मुलींच्या शाळेची फी भरण्यासाठी कोणी मदत करू शकेल का, असं आवाहन मैत्रिणीनं केलं होतं. मदत करताना राहून राहून मनात हा विचार येत होता, की भारतात अशी किती कुटुंब असतील जी पुरेशा आयुर्विम्याअभावी अशा आर्थिक संकटात सापडत असतील.

विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाची (IRDA) आकडेवारी असं दर्शवते, की भारतात ५० टक्क्यांहून कमी पात्र लोक आयुर्विमासंरक्षण घेतात. विकसित देशांत हेच प्रमाण ९० टक्क्यांच्या वर आहे. तसेच जे भारतीय विमा घेतात त्यांचं सरासरी आयुर्विमासंरक्षण हे अत्यंत तोकडं सुमारे चार लाख रुपये आहे. म्हणजे कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर एखाद्या कुटुंबाला चार लाख रुपये मिळाले, तर त्यातून त्यांचा वर्षभराचा खर्चही निघणार नाही. भारतीयांमधील आयुर्विम्याविषयी २०१४ मध्ये केलेलं एक संशोधन असं दर्शवतं, की आपली विम्याची खरी गरज आणि आपण घेतो ते संरक्षण त्यात तब्बल ९२ टक्के एवढी तूट आहे- ज्याला एक कोटी रुपयांच्या विमासंरक्षणाची गरज आहे तो फक्त आठ लाखांचा विमा घेतो.

आयुर्विम्याविषयीच्या अनास्थेला समाजातील मोठ्या प्रमाणावर असलेली आर्थिक निरक्षरता जबाबदार आहे, पण जे आयुर्विमा घेतात त्यांना पुरेसं संरक्षण न मिळण्यामागे आयुर्विमा कंपन्या आणि त्यांची विकण्याची पारंपरिक पद्धत मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.

दुर्दैवानं भारतात आयुर्विमा म्हणजे वर्षानुवर्षांपासून दीर्घकालीन गुंतवणुकीचं किंवा करबचतीचं साधन मानलं जातं आहे. त्यामुळ‌े आजही असंख्य लोक आयुर्विमा पॉलिसी काढताना ‘मला किती पैसे परत मिळतील’ याची आकडेमोड करत बसतात. मात्र या सगळ्यात त्यांना ना धड चांगला गुंतवणूक परतावा मिळतो, ना पुरेसं विमासंरक्षण! समाजात फिरत असलेल्या असंख्य विमा एजंटांच्या गोड बोलण्याला आणि फसव्या आकडेमोडीला ते फशी पडतात आणि चुकीचे पर्याय गळ्यात पाडून घेतात. गेल्या वेळी आपण पाहिलं, की टॅक्स वाचवणे हे आपलं प्राथमिक उद्दिष्ट असू शकत नाही. तेव्हा आयुर्विमा या विषयाचा विचार नक्की कसा केला पाहिजे हे आपण आपल्या डोक्यात पक्क बसवून घेतलं पाहिजे.

सर्वात प्रथम आपण समजून घेउया आयुर्विमा म्हणजे काय आणि खरंच आपल्याला त्याची गरज आहे का किंवा नक्की याची गरज कोणाला आहे. आयुष्य अनेक अनिश्चित घटनांनी भरलेले आहे. अशा कुठल्याही आकस्मिक, अनिश्चित गोष्टींमुळे होणारं एखाद्याचं आर्थिक नुकसान भरून काढता यावं, यासाठी विमा ही संकल्पना अस्तित्वात आली. आपण आपल्या गाडीचा विमा काढतो, मेडिक्लेम (वैद्यकीय विमा) काढतो किंवा परदेशात जाताना प्रवासविमा काढतो. या प्रत्येकात आकस्मिक आर्थिक नुकसानीच्या प्रसंगी भरपाई मिळण्याची सोय असते. त्यासाठी आपल्याला प्रीमियम (हफ्ता) भरावा लागतो, जो विमासंरक्षणाच्या रकमेच्या तुलनेत फार लहान असतो. सर्व प्रकारच्या विम्याला एक नियम लागू होतो- विमासंरक्षण घेतलं आणि ते वापरावे लागलं नाही तर कधीही चांगलं. मात्र गरज पडली आणि ते जवळ नसेल तर सगळ्यात वाईट!

आयुर्विमा हीदेखील तशीच संकल्पना आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्यावरील अवलंबून व्यक्तींचं भवितव्य अधांतरी राहू नये, त्यांच्या भविष्यातील खर्च भागवण्यासाठी निर्वाहनिधी उपलब्ध व्हावा हा आयुर्विम्याचा उद्देश आहे. त्यानुसार आयुर्विमा पॉलिसी ही संरक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना एक ठरावीक रक्कम देऊ करते. इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की विम्यामुळे जोखीम कमी होत नसते, तर फक्त त्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरून निघू शकतं.

सर्व प्रकारच्या विम्याला एक नियम लागू होतो- विमासंरक्षण घेतलं आणि ते वापरावे लागलं नाही तर कधीही चांगलं. मात्र गरज पडली आणि ते जवळ नसेल तर सगळ्यात वाईट!

याचा आपण थोडासा खोलात जाऊन विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल, की केवळ कमावत्या व्यक्तींनाच आयुर्विम्याची खरी गरज आहे. अर्थातच गृहिणी, सेवानिवृत्त व्यक्ती किंवा लहान मुलं यांच्या नावे आयुर्विमा पॉलिसी काढण्याची काहीच गरज नाही. या सर्वांच्या नावे आर्थिक गुंतवणुकी असाव्यात, तसंच त्यांना कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या आयुर्विमा पॉलिसीमध्ये लाभार्थी ठेवावं, पण त्यांना विमासंरक्षणाची गरज नाही.

दुसरा प्रश्न म्हणजे किती रकमेचं विमासंरक्षण पुरेसं समजावं? या प्रश्नाचं उत्तर अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. ज्याचा विमा काढायचाय त्या व्यक्तीचं वय, वार्षिक उत्पन्न, कोण कोण तिच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत, कामाचं स्वरूप, तिची मालमत्ता आणि न फेडलेली कर्जं या त्यातल्या प्रमुख गोष्टी आहेत. मागील लेखात दिल्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या कुटुंबासाठी दीर्घकालीन उद्दिष्टं ठरवली असतील, तर तुमच्या अनुपस्थितीत ती साध्य करण्यासाठी किती रक्कम लागेल याचा अंदाज बांधला तरी चालू शकेल.

एक ढोबळ अंदाज बांधायचा, तर पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी असणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला वार्षिक उत्पन्नाच्या किमान दहापट तरी विमासंरक्षण गरजेचं आहे. हेच ४५-५० वयोगटातील व्यक्तीला वार्षिक उत्पन्नाच्या पाच-सहापट विमासंरक्षण असलं तरी पुरेसं असू शकतं. इथे हे अधोरेखित करावं लागेल, की विमासंरक्षणाची गरज ही व्यक्तीसापेक्ष असते. त्यासाठी एकच नियम सर्वांना असं साचेबद्ध उत्तर सांगणं अवघड आहे.

आता १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला दहापट म्हणजे १.२ कोटी रुपयांचं विमासंरक्षण गरजेचं असेल, तर पारंपरिक मनीबॅक, एन्डोमेंट किंवा तत्सम पॉलिसीतून ती गरज भागवता येईल का? २५ वर्षांसाठी अशी पॉलिसी कोणी घेतलीच तर त्याचा वार्षिक प्रीमियम तीन ते चार लाखांच्या घरात जाईल. म्हणजेच त्या व्यक्तीला आपलं २५-३० टक्के वार्षिक उत्पन्न फक्त विम्याच्या हप्त्यावर खर्च करावं लागेल. अर्थातच हे अशक्य आहे.

त्यामुळे पुरेसं विमासंरक्षण मिळण्यासाठी आयुर्विम्याचादेखील आपण ‘गुंतवणूक नव्हे, केवळ विमा’ अशा पद्धतीनं विचार केला पाहिजे. फक्त आणि फक्त विमासंरक्षण देणाऱ्या टर्म प्लानना आपण प्राधान्य दिलं पाहिजे- नव्हे अनिवार्य समजलं पाहिजे. २५ वर्षांसाठी १.२ कोटी रुपयांचा आयुर्विमा संरक्षण टर्म प्लान २५,००० रुपयांपेक्षा कमी वार्षिक हप्त्यात मिळू शकतो.

आज आयुर्विम्याचा आपण विम्याच्या अंगानं धांडोळा घेतला. एक गुंतवणूक म्हणून पारंपरिक आयुर्विमा पॉलिसी कशा चुकीच्या ठरतात ते आपण पुढील लेखात बघू.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *