आयुर्विमा : टर्म प्लानचे माहात्म्य

आजचे धकाधकीचे जीवन आणि वाढती अनिश्चितता लक्षात घेतली तर ‘आयुर्विम्याला पर्याय नाही’ हे अगदी खरेच आहे. स्वतःला जबाबदार म्हणवणाऱ्या प्रत्येक कमावत्या माणसाने स्वतःच्या आयुष्याचा विमा काढणे, ही अनिवार्य गोष्ट समजली पाहिजे. परंतु आयुर्विम्याची सांगड गुंतवणुकीशी घालायचा प्रयत्न केलात तर ‘तेल ही नाही, तूप ही नाही’ अशी अवस्था होते. त्यामुळे आयुर्विमा घ्यावा तो फक्त आणि फक्त विमासंरक्षण देणारा- टर्म प्लान, ज्यात गुंतवणूक, परतावा या भानगडी नसतील.

आता कोणीही विचार करेल, की टर्म प्लानमधे फक्त विमासंरक्षण मिळते आणि पारंपरिक पॉलिसीमध्ये  विमासंरक्षणासोबत गुंतवणूक परतावादेखील मिळतो, भरलेल्या हप्त्यांचे पैसे कालांतराने परत मिळतात. मग पहिले दुसऱ्यापेक्षा सरस कसे काय?

आयुर्विम्याची सांगड गुंतवणुकीशी घालायचा प्रयत्न केलात तर ‘तेल ही नाही, तूप ही नाही’ अशी अवस्था होते.

या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला दोन्हींच्या प्रीमियमची तुलना करावी लागेल. ज्यात विमासंरक्षणासोबत गुंतवणूक अंतर्भूत असते अशा एन्डोमेंट, मनी-बॅक इत्यादी प्रकारच्या पॉलिसींमध्ये आपल्याला जो वार्षिक प्रीमियम हप्ता भरावा लागतो तो त्याच रकमेच्या टर्म पॉलिसीच्या हप्त्याच्या सुमारे दहा-बारा पट अधिक असतो. म्हणजेच एखाद्याला ५० लाख रुपयांचा २५ वर्षांसाठी विमा काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या पॉलिसीमधे १.८ ते २ लाख रुपयांचा वार्षिक हप्ता बसत असेल, तर टर्म प्लानमध्ये त्यासाठीचा वार्षिक हप्ता केवळ १५,०००-१८,००० रुपये असेल. याचाच अर्थ, टर्म प्लानमुळे आपली वार्षिक जावक सुमारे ९० टक्क्यांनी वाचते. अशा पद्धतीने वाचवलेली रक्कम आपण गुंतवणुकीसाठी वापरून त्यातून चांगला परतावा मिळवू शकतो.

आपण बघितले, की पारंपरिक पॉलिसीमध्ये मिळणारा परतावा हा कंपनीच्या मर्जीनुसार दरवर्षी देऊ केलेल्या बोनसवर अवलंबून असतो. ढोबळमानाने २५ वर्षांच्या एन्डोमेंट पॉलिसीत प्रीमियमचे सगळे हप्ते भरले, तर विमासंरक्षण रकमेच्या दुप्पट रक्कम आपल्या हाती पडते. म्हणजेच वार्षिक रु. १.८-२ लाख प्रीमियम २५ वर्षे भरल्यास शेवटी सुमारे रु. १ कोटी मिळू शकतात.

आता हेच नियोजन आपण वेगळ्या पद्धतीने केले- ५० लाखांचा टर्म प्लान १५,००० रुपये वार्षिक प्रीमियममध्ये घेतला आणि वाचलेले (रु. १,८०,००० वजा रु. १५,००० असे) रु. १,६५,००० पुढील २५ वर्षे गुंतवणुकीसाठी वापरले तर किती परतावा मिळू शकेल? पुढील कोष्टकात वेगवेगळे गुंतवणूक पर्याय आणि त्यातून मिळू शकणारा परतावा यांची तुलना दिली आहे. या प्रत्येक पर्यायात ५० लाखांचा २५ वर्षांसाठीचा आयुर्विमा अंतर्भूत आहे.

विमा आणि गुंतवणूक एकत्र किंवा वेगवेगळे करण्याचे विविध पर्याय

या ठिकाणी हे नमूद केले पाहिजे, की पर्याय ३ आणि ४ साठी वार्षिक सरासरी १२ टक्के-१५ टक्के परताव्याचे अंदाज हे भूतकाळातील परताव्यापेक्षा मुद्दाम कमी धरलेले आहेत. आतापर्यंतच्या भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात कुठलाही सलग २५ वर्षांचा काळ घेतला, तर इंडेक्स फंडनी (निफ्टी किंवा सेन्सेक्सप्रमाणे परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना) १४ टक्क्यांहून जास्त परतावा दिला असता. तसेच सर्वसाधारण म्युच्युअल फंड योजनेतून वार्षिक सरासरी १८ टक्के परतावा मिळू शकला असता.

वरील सुलभ अंदाजकोष्टकावरून हे सहज दिसून येते, की टर्म प्लान आणि पीपीएफ यांची जोडीसुद्धा पारंपरिक आयुर्विमा पॉलिसींपेक्षा जास्त परतावा मिळवून देऊ शकते. म्हणजेच ५० लाख रुपयांचा विमा तर मिळेलच शिवाय सुमारे २० टक्क्यांहून जास्तीचा परतावाही मिळेल. म्युच्युअल फंडातील सर्वात सोपा इंडेक्स योजनांचा पर्याय निवडल्यास ५० लाखांच्या विम्यासोबत २५ वर्षांत सुमारे सव्वादोन कोटींची पुंजी जमा होऊ शकेल. आपण जर व्यवस्थित अभ्यासपूर्वक निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये अशी गुंतवणूक करत गेलो तर मिळणारा परतावा हा अनेक पट जास्त असू शकतो. हातचे राखून केलेली आकडेमोडही साडेतीन कोटींचा आकडा दर्शवते.

आपण विमा आणि गुंतवणूक ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे आणि आर्थिक नियोजन करताना त्यांचा पूर्णपणे स्वतंत्र विचार केला पाहिजे, हे ध्यानात घेतले तर आर्थिक साक्षरतेमधला मोठा टप्पा गाठला असे म्हणता येईल.

टर्म प्लानबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील बहुतेक सर्व आयुर्विमा कंपन्या- भारतीय आयुर्विमा महामंडळसुद्धा – आता टर्म पॉलिसी ऑनलाइन विकतात. त्यामुळे देशभरातील कुठलाही ग्राहक मध्यस्थाशिवाय थेट कंपनीकडून ही पॉलिसी विकत घेऊ शकतो. विमाविक्रेत्याकडून पॉलिसी घेण्यापेक्षा तीच थेट कंपनीकडून घेतल्यास प्रीमियमचा हप्ता २०-२५ टक्के कमी पडतो. अर्थातच, आपल्याला एजंटचे कमिशन द्यावे लागत नाही त्याचा हा फायदा.

वरील सगळ्या गणितात एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे शिस्त आणि संयम. कुठल्याही गुंतवणुकीच्या यशासाठी फार महत्त्वाच्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण एन्डोमेंट पॉलिसी घेतली तर दरवर्षी प्रीमियम हप्त्याची रक्कम सक्तीने भरावीच लागते. बहुतेकदा लोक अक्षरशः भक्तिभावाने आयुर्विमा पॉलिसीचे हप्ते भरताना दिसतात, त्याच्या अनुषंगाने इतर खर्च भागवतात. पारंपरिक आयुर्विमा पॉलिसीत सक्तीपोटी शिस्त पाळली जाते आणि आपण दरवर्षी पॉलिसीचा गुंतवणूक परतावा मोजत नसल्यामुळे, २०-२५ वर्षे सातत्याने हप्ते भरत असल्याने, अज्ञानातून का होईना, पण संयमही पाळला जातो.

एकदा का टर्म प्लान आयुर्विमा काढून झाला, की मग दीर्घकालीन गुंतवणूक म्युच्युअल फंडात करताना अशी सक्ती नसते. एसआयपीचे (SIP) हप्ते चुकले तरी काही दंड होणार नसतो किंवा नवीन गाडी घ्यायची आहे अथवा शेअर बाजारात पडझड होण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत अशा कुठल्याही सबबीखाली आपण सहजी पैसे काढून घेऊ शकतो. त्यामुळे इथे आपले आर्थिक नियोजन आणि शिस्त पाळण्यासाठी आपला आत्मविश्वास, मानसिक कणखरता यांची कसोटी लागते. जर आपण ती शिस्त आणि संयम पाळू शकलो तर त्यामुळे होणाऱ्या फायद्याची कल्पना वरील कोष्टक पाहिल्यास आपण करू शकतो. अर्थात हा गुंतवणुकीच्या अंगाने करायचा विचार झाला. आयुर्विम्याच्या दृष्टीने कमीत कमी प्रीमियममधे सर्वाधिक विमा संरक्षण देणारा- ‘आखूडशिंगी, बहुदुधी’असा टर्म प्लानच सर्वोत्तम!

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *