गुंतवणुकीचं तंत्र आणि मंत्र

डिसेंबर महिना सुरू झाला आहे आणि गुलाबी थंडीच्या चाहुलीसोबत शेअर बाजारानं घेतलेल्या भरारीनं इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार सुखावले असतील. साहजिकच अनेकांना सप्टेंबर-ऑक्टोबरमधली बाजारातील पडझड, त्यावेळी एकामागून एक येणाऱ्या निराशाजनक आर्थिक बातम्या, ‘येणारा काळ अधिक खराब कसा असेल’ या विषयीच्या चर्चा वगैरे गोष्टींचा काहीसा विसर पडला असेल. मात्र शेअर बाजार म्हटलं, की पडझडीचे प्रसंग पुनःपुन्हा येत राहणार. तेव्हा सामान्य गुंतवणूकदारानं आपला धीर सुटू नये, लक्ष विचलित होऊ नये यासाठी वैयक्तिक पातळीवर काही पथ्यं सांभाळावी लागतात, त्यांचा आढावा आपण घेऊ.

सर्वात प्रथम गुंतवणूकदाराला हा आत्मविश्वास असला पाहिजे, की इक्विटी म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. आपण जे करतोय त्यावरच जर आपला पूर्ण विश्वास नसेल तर थोड्याशा अडचणीनंही  गुंतवणूकदार हवालदिल होऊ शकतो. त्यासाठी वेळ घालवून, वाचन करून किंवा तज्ज्ञ व्यक्तीशी चर्चा करून स्वतःचं या विषयातलं ज्ञान वाढवलं पाहिजे. इक्विटी किंवा समभागांच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक म्हणजे एखाद्या कंपनीत/ व्यवसायात विकत घेतलेला मालकी हक्क आहे आणि त्यामुळे त्याच्यावरील परतावा कंपनीच्या कामगिरीनुसार ठरणार याची खूणगाठ बांधली पाहिजे. कुठलाही व्यवसाय म्हटला, की नफा-विक्री यात वर-खाली होत राहणार आणि सुनिश्चित दरानं प्रतिवर्षी परतावा मिळत आहे असं होणार नाही. हाच इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतील जोखमीचा भाग आहे.

आता कुणालाही असा प्रश्न पडेल, की ही जोखीम कुणी का पत्करावी? तर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आपल्याला चलनवाढीच्या दराच्या कितीतरी जास्त परतावा देऊ शकते. उदाहरणार्थ, निफ्टी किंवा सेन्सेक्स या प्रमुख इंडेक्समधील गेल्या २५-३० वर्षांतील वाढ पाहिली तर प्रतिवार्षिक वृद्धिदर १५ टक्क्यांच्या आसपास होता, असं दिसतं. ही सगळी वाढ हर्षद मेहता/ केतन पारेख घोटाळे, १९९७ सालचे आशियाई देशांतील चलनसंकट, २००१च्या सुमारास डॉट कॉम क्षेत्रातील अतिप्रचंड पडझड, २००८-०९ सालचे जागतिक आर्थिक संकट आणि इतर अनेक लहानमोठ्या संकटांचा सामना करून झालेली आहे. यांच्या तुलनेत गेल्या तीन दशकांत भारतातील महागाईचा दर वार्षिक सरासरी ७-७.५ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. म्हणजेच इक्विटीक्षेत्रातील गुंतवणूक आपल्याला चलनवाढीवर मात करून आर्थिक उन्नतीसाठी मदत करू शकते.

जेव्हा आपल्याला मुदतठेवीवर बँक ७-७.५ टक्के व्याज देते तेव्हा ते पैसे काही बँकेत पडून राहणार नसतात. बँक आपले ४-४.५ टक्के मार्जिन त्यात घालून ११-१२ टक्के सरासरी दरानं ते पैसे पुढे कर्जाऊ देत असते. बहुतांशी व्यावसायिकांना ही कर्जं १२-१४ टक्के दरानं उपलब्ध होतात. अशा चढ्या दरानं घेतलेली कर्जं फेडण्यासाठी व्यवसायातून १८-२० टक्के वार्षिक परतावा मिळणं गरजेचं असतं. इक्विटी किंवा समभागांच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक म्हणजे बँकेकडे ७-७.५ टक्क्यांच्या मुदतठेवीत पैसे ठेवण्याऐवजी १८-२० टक्के परतावा मिळवू शकेल अशा व्यवसायात गुंतवणं होय. याचाच अर्थ आपण जास्तीची जोखीम या अतिरिक्त लाभ मिळवण्याच्या उद्दिष्टातून उचलत असतो.

आपल्याला शेअर बाजारातील पडझडीकडे एखादी समस्या म्हणून नव्हे तर त्याचा आंतरिक भाग, एक स्वभावविशेष म्हणून बघायला शिकलं पाहिजे.

आता शेअर बाजाराचं स्वरूपच असं आहे, की त्यात ‘करेक्शन’ म्हणजेच पडझड नित्यनेमानं होत असते. गेल्या तीन दशकांमधील भारतीय शेअर बाजाराचा अभ्यास केला, तर असं दिसून येतं, की जवळजवळ प्रत्येक वर्षी निफ्टी/ सेन्सेक्स त्यांच्या उच्चांकापासून एकदा तरी १०-१५ टक्के खाली आलेले आहेत, प्रत्येक ३-५ वर्षांच्या काळात किमान एकदा २०-३० टक्क्यांची पडझड झाली आहे आणि प्रत्येक १० वर्षांच्या कालखंडात एकदा ४०-५० टक्के पडणं हे स्वाभाविक मानलं जातं. आपल्याला शेअर बाजारातील पडझडीकडे एखादी समस्या म्हणून नव्हे तर त्याचा आंतरिक भाग, एक स्वभावविशेष म्हणून बघायला शिकलं पाहिजे. जास्तीच्या परताव्याचा विचार करताना शेअर बाजाराला त्याच्या या आपल्याला न आवडणाऱ्या वैशिष्ट्यासह स्वीकारणं गरजेचं आहे.

या करेक्शनच्या धक्क्यांपासून आपण आपली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकतो का? जगभरातील असंख्य शेअर बाजारविश्लेषक आणि अर्थसंशोधक वर्षानुवर्षं अशा रामबाण उपायाच्या शोधात आहेत, की ज्यामुळे शेअर बाजार कधी पडेल, किती पडेल, किती काळ पडत राहील, केव्हा, किती वर जाईल वगैरे प्रश्नांची अचूक उत्तरं मिळतील आणि त्यानुसार निर्णय घेत राहिलं की शेअर बाजारातील पडझडीच्या त्रासातून पूर्ण मुक्तता मिळेल. असे संशोधक आणि विश्लेषक हे परीस किंवा अमृत शोधणाऱ्या लोकांपेक्षा फारसे वेगळे नाहीत. शेअर बाजार अतार्किक आणि अनपेक्षित पद्धतीनं वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. 

अनेक लोकांना हा अनुभव येतो, की आपण गुंतवणूक करतो तेव्हाच बाजारात पडझड सुरू होते, जणू काही आपलीच वाट बघत होती. आणि जेव्हा आपण पैसे बाहेर काढून घेतो तेव्हापासून थोड्याच काळात बाजारानं पुन्हा भरारी मारायला सुरुवात केलेली असते.

याचसाठी गुंतवणूकदारांना इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना पाळावं लागणारं पुढचं पथ्य आहे ‘सुनिश्चित उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी गुंतवणूक.’ सुरुवातीलाच हे ठरवून घ्या, आपल्याला कशासाठी ही गुंतवणूक करायची आहे. त्यामुळे बाजारातील चढउतारांकडे आपण योग्य दृष्टिकोन ठेवून बघू शकतो आणि फुकाची चिंता आणि चुकीचे निर्णय टाळू शकतो.

 

उदाहरणार्थ, आजपासून २० वर्षांनी सेवानिवृत्तीसाठी पुंजी जमा करण्यासाठी मी गुंतवणूक सुरू केली असेल, तर २०१८-१९ मध्ये होणाऱ्या बाजारातील चढउतारांमुळे मी अस्वस्थ होऊन चालेल का? गुंतवणुकीचं दिवसागणीक घटणारं मूल्य समोर दिसत असताना असा दीर्घकालीन विचार करणं अनेकांना कठीण वाटू शकेल, परंतु ते अजिबात कठीण नाही. आपल्यातले अनेक जण आजही विमा कंपन्यांच्या एन्डाउमेंट किंवा मनीबॅक प्रकारच्या योजना गुंतवणूक म्हणून घेतात. त्यांनी आपल्या या ‘गुंतवणुकी’च्या पहिल्या ८-१० वर्षांत परतावामूल्य पॉलिसी बंद केल्यास परत किती पैसे मिळू शकतात हे माहीत करून घेतलं, तर शेअर बाजारातील १५-२० टक्के पडझडीचं त्यांना काहीच वाटणार नाही. ज्यांना रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी योग्य वाटते अशांनी विकत घेतलेल्या घराला पुढील वर्षी किती किंमत येते ते पाहावं.

शेअर बाजारात रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचं मूल्यांकन होत असतं, ते आपण बघू शकतो, त्यामुळे पडझडीचा मानसिक ताण येतो. मात्र इतर ठिकाणी मूल्यांकन इतकं सुलभ आणि पारदर्शी नसल्यामुळे सुरक्षिततेचा आभास निर्माण होतो. यशस्वी होण्यासाठी गुंतवणूकदारांनी याच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *