उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

बहुसंख्य सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजना, दीर्घकालीन महागाईची गृहितके आणि त्याचे परिणाम, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी संकल्पना आणि त्यासाठी करावी लागणारी आकडेमोड यांचा मनस्वी तिटकारा किंवा अनामिक भीती (fobia) असते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे समजूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष किंवा चालढकल करणे चालू राहते. त्यातून चुकीचे पर्याय गुंतवणूक म्हणून निवडले जातात. त्यामुळेच हे विषय सुलभ करून भीती दूर करणे हे आवश्यक ठरते.

महागाईच्या तडाख्याने आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा अनेक पटींनी कशा वाढत जातील आणि त्यानुसार दीर्घकालीन उद्दिष्टे कशी निश्चित करावीत ते आपण गेल्या आठवड्यात जाणून घेतले. त्यासाठी सुलभ अंदाजाचे आडाखेही आपण पाहिले. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनातील ही पहिली पायरी होय. हे म्हणजे प्रवासाला निघताना कुठे, कधी पोचायचे, किती अंतर कापायचे ते निश्चित करण्यासारखेच आहे. 

एकदा आपण भविष्यातील आपल्या आर्थिक गरजा ठरवू शकलो, तर त्यानंतरची पायरी म्हणजे योग्य वेळी उद्दिष्टपूर्तीसाठी शिल्लक कालावधीनुसार आपण किती गुंतवणूक करायला हवी ते ठरवणे. थोडक्यात, इच्छित स्थळी योग्य वेळी पोचण्यासाठी प्रतितास, प्रतिदिन किती अंतर कापले पाहिजे त्याचा अंदाज बांधणे होय.

इथे आपल्याला काही गृहितके निश्चित करायला हवीत. आपले पाहिले गृहितक आहे, की इक्विटी म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणुकीतून दरसाल सरासरी १२ टक्क्यांप्रमाणे परतावा मिळेल. गेल्या वेळी म्हटल्याप्रमाणे भविष्यात नक्की काय होईल हे सांगणे अशक्य असले, तरी आपल्याला वास्तववादी अंदाज बांधणे गरजेचे आहे. गेल्या ३० वर्षांतील सेन्सेक्स किंवा निफ्टीचा आढावा घेतला, तर वार्षिक सरासरी १५-१६ टक्के या दराने वाढ झाल्याचे दिसून येते. अनेक म्युच्युअल फंडांतील योजनांनी २०-२५ टक्के दरानेही परतावा दिला आहे. मात्र आपण उद्दिष्टपूर्तीच्या खात्रीसाठी परताव्याची अपेक्षा कमीतकमी ठेऊ.

दिलेल्या गृहितकांनुसार आकडेमोड केल्यास दरमहा रु.१०००/- ने सुरू केलेल्या गुंतवणुकीने किती पुंजी जमा होईल त्याचे सुलभ अंदाज

दुसरे गृहितक असे, की आपण दर महिना ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवू (Systematic Investment Plan) आणि ती रक्कम दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढवत नेऊ. म्हणजेच जर दरमहा रु.१,०००/- ने सुरूवात केली तर १३व्या महिन्यापासून ती रु. १,०५०/- होईल आणि २५व्या महिन्यापासून ती रु. १,१०२.५/- होईल. असे पुढील १०-२०-३० वर्षे आपण करत राहू. असे ठरवण्यामागील कारण म्हणजे बहुतेक लोकांचे उत्पन्न दरवर्षी वाढत जाते, त्यामुळे गुंतवणुकीत वाढ करत राहणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकदम पहिल्या वर्षापासून मोठी गुंतवणूक सुरू करणे अनेकांना कठीण वाटू शकते. त्यामुळे उत्पन्नाप्रमाणे गुंतवणूक वाढवत नेणे कधीही श्रेयस्कर. अर्थात हे सुलभ अंदाज आहेत. काटेकोर आकडेमोड केल्यास उत्तरे थोडीफार मागेपुढे होऊ शकतात. 

याचा उपयोग कसा कराल?
गेल्या आठवड्यात दिलेल्या कोष्टकानुसार आपण हे शोधले होते, की आजपासून २५ वर्षांनी निवृत्त होण्यासाठी मला ३ कोटी रुपयांची आवश्यकता असेल. आता वरील कोष्टकावरून आपण हे शोधू शकतो, की आज सुरू केलेली १००० रुपयांची मासिक गुंतवणूक २५ वर्षांनंतर २८ लाख रुपये देईल. म्हणजेच ३ कोटी रुपये जमा करण्यासाठी मला ३ कोटी भागिले २८ लाख = १०,७०० म्हणजेच सुमारे ११,००० रुपये मासिक गुंतवणूक सुरू करून ती दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढवत न्यायला हवी.
महिना एक लाख रुपये उत्पन्न असलेल्या एखाद्या ३० वर्षांच्या पती-पत्नीला आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या पदवीशिक्षणासाठी १५ वर्षांनी २५ लाख रुपये जमवायचे असल्यास, वरील कोष्टकानुसार सुमारे ४००० रुपयांची  मासिक गुंतवणूक सुरू करावी लागेल. तसेच तिच्या उच्चशिक्षणासाठी २० वर्षांनी ५० लाख रुपये लागणार असतील तर त्यासाठी ३५०० रुपयांची मासिक गुंतवणूक सुरू करावी लागेल. त्याचप्रमाणे त्यांच्या निवृत्तीसाठी ३० वर्षांनी ५ कोटी रुपये लागणार असतील, तर अजून १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे दरमहा १७,५०० रुपयांची गुंतवणूक सुरू करून दरवर्षी त्यात ५ टक्क्यांची वाढ करून त्यांना ही तीनही उद्दिष्ट साध्य करता येतील.

महागाईदरामुळे आपले खर्च भविष्यात कसे वाढत जातील त्याचे सुलभ अंदाज कोष्टक

म्हणजेच, अवघ्या १५-२० मिनिटांत एका कुटुंबाचे आर्थिक नियोजनाचे गणित फार आकडेमोड न करावी लागता आपण तयार केले आहे, आहे ना सोपे?

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा आणि विनंती आहे, की नवीन वर्षाची सुरुवात त्यांनी आपापल्या कुटुंबासाठी या सोप्या सुलभ पद्धतीने आर्थिक नियोजनाचे गणित मांडून करावी.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *