आधी कळस, मग पाया

दोन आठवड्यांपूर्वी आपण इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात काय पथ्यं पाळावीत ते पाहिलं (पहा: ‘गुंतवणुकीचं तंत्र आणि मंत्र’). त्यात ‘सुनिश्चित उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी गुंतवणूक’ करणं गरजेचं आहे, असं म्हटलं होतं. तसं पाहायला गेलं तर ऐकणाऱ्याला हा सल्ला अगदीच गुळमुळीत किंवा बाळबोध वाटू शकतो, कारण आपण याचा खोलात जाऊन विचार का करायला पाहिजे आणि तो कसा करायला पाहिजे, हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यामुळे अनेकदा आर्थिक नियोजनाच्या पहिल्याच पायरीवर गणित चुकतं आणि नंतर ते सोडवायला कसरत करत बसावं लागतं.

काही महिन्यांपूर्वी आमच्या ऑफिसमध्ये जोशीकाका येऊन गेले. आपण त्यांचं उदाहरण घेऊ. पंधरा वर्षं हप्ते भरून कुठल्याशा आयुर्विमा पॉलिसीचे त्यांना नुकतेच पाचेक लाख रुपये मिळाले होते. “मुलाच्या कॉलेजच्या शिक्षणाला एकरकमी मोठी रक्कम मिळेल, असं सांगून एजंटनं तेव्हा ही पॉलिसी मला घ्यायला लावली,” काका सांगत होते. “पण आज लक्षात येतंय, की त्या पैशांत इंजिनीयरिंगचं एखादं वर्षही निघणार नाही.” काकांनी महागाईमुळे भविष्यात खर्च किती वाढू शकतात याचा पॉलिसी घेताना विचार केला असता, तर असा भ्रमनिरास पदरी पडला नसता.

जोशीकाका हे प्रातिनिधिक उदाहरण आहे, आपल्या सगळ्यांचंच! पुढील १०, २०, ३० वर्षांत महागाईमुळे आपले दैनंदिन आयुष्यातील खर्च कसे वाढत जाणार आहेत, आणि त्यामुळे आपल्या जीवनशैलीवर कसे परिणाम होत जाणार आहेत याचा अंदाज आपण बांधत नाही आणि म्हणून दीर्घकालीन गुंतवणुकीचं महत्त्व समजणं आपल्याला जड जातं.

आपण प्रत्येकानंच भविष्याबद्दल काही स्वप्नं रंगवलेली असतात- सुखी कुटुंब, उच्च शिक्षित मुलं, प्रशस्त घर, गाडी आणि शेवटी निवांत सेवानिवृत्ती वगैरे. अर्थातच प्रत्येक स्वप्नाची पूर्तता पुरेशा निधीवर अवलंबून असते.

कोणत्याही व्यक्तीसाठी आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजेच ही स्वप्नं किंवा उद्दिष्टं सुनिश्चित करणं आणि अशा प्रत्येक स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्या त्या वेळी आपल्याला किती खर्च उचलावा लागणार आहे त्याचा अंदाज बांधणं होय. इथूनच आपण सुरुवात केली तर यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद आपण करून ठेवू शकतो.

आता भविष्यात एखाद्या गोष्टीवर नक्की खर्च किती येईल हे अचूक सांगणं कोणालाच शक्य नाही. तरीही अगोदरच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे ‘पूर्णपणे चूक असण्यापेक्षा थोडंतरी बरोबर असणं कधीही श्रेयस्कर’. त्यामुळे काही गृहितकं करून त्या आधारे अंदाज बांधून कृती ठरवणं आणि पुढे जशी नवनवीन माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे आपल्या नियोजनामध्ये फेरफार करण्याबाबत निर्णय घ्यावा हे योग्य!

भविष्यातील खर्चाचा अंदाज बांधताना आपल्याला दोन घटकांविषयी माहिती आवश्यक असते. सर्वात प्रथम, समजा, ती गोष्ट आज करायची झाली, तर आजच्या बाजारमूल्यानुसार किती खर्च येईल आणि दुसरं, महागाईचा किंवा चलनवाढीचा दर काय राहील. म्हणजेच, आज सेवानिवृत्ती घेणाऱ्या व्यक्तीसाठी किती पुंजी पुरेशी असेल हे आधी शोधा आणि त्यावरून स्वतःची सेवानिवृत्ती जर २०-२५ वर्षांनी असेल, तर महागाईच्या दरानुसार किती पुंजी जमवावी लागेल त्याचा अंदाज घ्या!
सध्या भारतातील महागाईचा दर जरी कमी असला तरी गेल्या ३० वर्षांत तो सरासरी ७-७.५ टक्क्यांच्या दरम्यान होता, असे दिसून येते. आपल्याला भविष्यातील १५-२० किंवा अधिक वर्षांचा आडाखा बांधायचा असल्यामुळे आपण दीर्घकालीन सरासरी दरवाढ गृहीत धरणं गरजेचं आहे. म्हणजेच आपलं आर्थिक उद्दिष्टाचं गणित असं मांडता येईल-

जर मी आज ६० वर्षांची असते, तर सुमारे ५० लाखांची तरतूद निवृत्तीकाळासाठी पुरेशी ठरली असती. प्रत्यक्षात मला निवृत्त व्हायला अजून २५ वर्षे आहेत, तर ७ टक्के महागाईदर पकडून तेव्हा मला किती रक्कम लागेल?

आता ज्यांना चक्रवाढ गणिताची आकडेमोड माहीत आहे, त्यांना यांचं उत्तर ५० लाख गुणिले (१.०७) चा २५वा घात असं करून शोधता येईल.
भविष्यातील खर्च = आताचा खर्च X (१ + महागाई दर) ^ उद्दिष्टपूर्तीसाठी असलेली वर्षं मात्र सर्वसामान्यांना ही आकडेमोड कठीण वाटू शकते. त्यामुळे ७-७.५ टक्के महागाईदरानं आपले खर्च भविष्यात कसे वाढत जातील, त्याचे सुलभ अंदाज पुढे दिले आहेत.

महागाईमुळे भविष्यात आपले खर्च किती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत त्यांचा अंदाज देणारे कोष्टक

हे सुलभ अंदाज आहेत, त्यामुळे काटेकोरपणे अचूक नाहीत. तरीही आपल्याला योग्य उत्तराच्या जवळ नेणारे आहेत.

वरील उदाहरणात आपण हे सहज शोधू शकतो, की आज सुखानं निवृत्त होण्यासाठी जर ५० लाख आवश्यक असतील तर २५ वर्षांनी निवृत्त होण्यासाठी त्याच्या सहा पट म्हणजेच सुमारे ३ कोटींची रक्कम आवश्यक ठरेल. याचं गणित करून उत्तर काढलं, तर महागाईदराच्या ७ किंवा ७.५ टक्के गृहीतकानुसार तब्बल २.७ कोटी किंवा ३ कोटी रुपये इतकं येतं!

जेव्हा आपल्यातला प्रत्येक जण महागाईच्या दीर्घकालीन परिणामांविषयी सजग होईल आणि त्यानुसार आर्थिक उद्दिष्टांचं मूल्यमापन करेल तेव्हाच आयुर्विमा पॉलिसी किंवा मुदतठेवी हे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कसं फोल आहे याचा अंदाज करू शकेल.

जाता जाता सांगायचं म्हणजे चार-पाच वर्षांपूर्वी जेव्हा जोशीकाका पहिल्यांदा आम्हाला भेटले तेव्हाच, आम्ही त्यांना ही गणितं समजावून त्यानुसार आर्थिक नियोजनाची घडी बसवण्यास मदत केली. मुलाच्या इंजिनीयरिंगच्या प्रवेशाच्या वेळीच पुढील चार वर्षांत होणाऱ्या खर्चाची तरतूद करून आज ते निश्चिंत आहेत. परवा बोलता बोलता मी गमतीनं त्यांना विचारलं “काय हो काका, जर इंजिनीयरिंगऐवजी तुमच्या मुलानं पायलट बनायचं ठरवलं असतं तर हो?” त्यांनी हसून तो विषय तिथंच सोडून दिला.

About the author

Prajakta Kashelkar

Prajakta is a qualified and experienced professional in the area of Personal Finance. Check 'About Us' section for more details about her and Pro-F Financial Consultants.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *